जिल्ह्याला विकासासाठी न्याय देण्याची भूमिका

पालकमंत्री पाटील; ग्रामपंचायतीचा निधी बंदिस्त गटारांसाठी खर्च करा ः शंभूराज देसाई

सातारा  – जिल्ह्यातील दुष्काळाबरोबर अतिवृष्टीमुळे उद्‌भवलेल्या संकटाच्या काळात जिल्ह्यातील प्रशासनाने एकसंघपणे चांगले काम केले. यापुढेही जिल्ह्याच्या विकासासाठी असेच एकसंघपणे काम करु या. सर्वांनी मिळून जिल्ह्याच्या विकासाच्या माध्यमातून लोकांना न्याय देण्याची भूमिका ठेवूया, असे आवाहन सहकार व पणनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सोमवारी केले.

पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीच्या खर्चाचा आढावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पणन राज्यमंत्री शंभुराज देसाई, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, उपवनसरंक्षक भारतसिंह हाडा, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, जिल्हा नियोजन अधिकारी बी. जे. जगदाळे आदींसह वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हा वार्षिक योजनेतून प्रत्येक विभागाला निधी प्राप्त झाला आहे, हा निधी शंभर टक्के खर्च करण्यावर भर देऊन सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम करावे, असे सांगून पालकमंत्री पाटील म्हणाले, “निधी खर्च करण्यासाठी कालावधी कमी राहिलेला आहे.

या निधीच्या खर्चासाठी झोकून देऊन काम करा. तसेच जिल्ह्यात विविध योजना समक्षपणे राबवा, सातारा येथील दुकानदार दुकानाच्या सुरक्षेतेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावतात, या दुकानदारांना त्यांच्या व लोकांच्या सुरक्षिततेसाठी दुकानाच्या बाहेरही सीसीटीव्ही लावण्यासाठी पोलीस विभागाने प्रोत्साहित करावे.’ मार्चनंतर वनांमधील पाण्याचे स्त्रोत आटल्यामुळे जंगली प्राणी मानवी वस्तीत येतात. हे जंगली प्राणी मानवी वस्तीत येऊ नयेत, म्हणून पाण्याचे स्त्रोत अधिक बळकट करावेत, अशा सूचनाही पालकमंत्री पाटील यांनी केल्या.

सहकारी सोसायट्यांच्या बळकटीकरणासाठी पथदर्शी कार्यक्रम राबवावा, जिल्हा परिषदेतला ग्रामपंचायतीतील कामांसाठी दिला जाणारा निधी जास्तीत जास्त बंदिस्त गटारांसाठी खर्च करावा. पालकमंत्री व राज्यमंत्री म्हणून जिल्हा वार्षिक योजनेतून जास्तीत जास्त निधीसाठी प्रयत्न केला जाईल, असे वित्त व नियोजन राज्यमंत्री देसाई यांनी या बैठकीत सांगितले. बैठकीच्या प्रारंभी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या भित्तिपत्रकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या बैठकीला विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)