संक्रांतीच्या खरेदीसाठी बाजारपेठा गजबजल्या

वाण खरेदीसाठी महिलांची मोठी गर्दी; रंगीत सुगड्यांना जादा मागणी
कराड  –
मकरसंक्रांती हा सण बुधवारी देशभर साजरा होत आहे. या सणासाठी लागणाऱ्या साहित्याने कराडच्या बाजारपेठा बहरल्या आहेत. तीळगूळ व पूजा साहित्याचे स्टॉल शहरात दिसत असून हा सण उद्या असल्याने खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी पहावयास मिळत आहे.

भारतामध्ये मकरसंक्रांतीचा सण हिंदू धर्माचा प्रमुख सण मानला जातो. जो सूर्य मकर राशीत प्रवेश करताना साजरा केला जातो. या उत्सवाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे 14 किंवा 15 जानेवारीला हा सण साजरा केला जातो. यंदा हा सण 15 जानेवारीला साजरा होत आहे. वेगवेगळ्या तारखांप्रमाणे नव्हे तर दरवर्षी, जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, तेव्हा हा सण साजरा करण्यात येतो. देशात वेगवेगळ्या पद्धतीने हा सण साजरा करतात. महाराष्ट्रात मात्र तिळगूळ घ्या, गोड गोड बोला असे म्हणत अनेकांचे तोंड गोड केले जाते.

मकरसंक्रांती उद्या साजरी होणार असल्याने या सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील दत्त चौक, चावडी चौक, बसस्थानक, नगरपालिका चौक परिसरात मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर तुळगूळ, तीळगूळ चिक्की, गूळ व पूजेचे साहित्याचे स्टॉल लागले आहेत. जागोजागी हळद-कुंकू, सुपारी, बदाम, खारीक, काळे तीळ, पांढरे तीळ, खोबरे, खारीक, वेलची, हळकुंड तसेच तिळगूळ आदी साहित्य विक्रीसाठी आले आहेत. रस्त्यावर दुकाने मांडण्यात आली आहेत. या साहित्यांना आता मागणी वाढू लागली असून ग्रामीण भागातील नागरिक सणाच्या अगोदरच या साहित्याच्या खरेदीसाठी येत आहेत. तसेच दुकांनामधून बाजरी, तिळगूळ, गूळ, डाळ आदींचीही खरेदी केली जात आहे. बाजारात सुगड्याही विक्रीसाठी आल्या आहेत.

यंदा रंगीत सुगड्याही उपलब्ध असून रंगीत सुगड्यांना जास्त मागणी दिसत आहे. भाजी मंबईतही भाज्यांची मोठी आवक असून पावटा, वाटाणा, गाजर, बोरे, चाकवत, पालक वांगी यास मागणी आहे. आजचा जमाना मोबाईल व व्हॉट्‌सऍपचा असला तरी मकरसंक्रांतीची आकर्षक भेटकार्डनी दुकाने सजली असून त्यांच्या किंमती 10 ते 150 रुपयांपर्यंत आहेत. वाण लुटण्यासाठी महिला बाजारात हळदी-कुंकू, बांगड्या, खण आदी सौभाग्य अलंकाराची खरेदी करताना दिसत आहेत.

मकरसंक्रांतीच्या सणाला लागणारा हलवा 120 रुपये किलो व तिळाच्या रेवड्या 120 रुपये किलो असा दर आहे. पांढऱ्या तिळाचा दर सुमारे 160 रुपये किलो, गूळ 60 रुपये किलो, बाजरी 25 रुपये किलो आहे. सुवासिनींना आवश्‍यक असणाऱ्या पूजा साहित्य संचाची किंमत 10 ते 20 रुपये आहे. तर सुगड्यांची किंमती प्रति सहा नगांसाठी 40 रुपयांपासून असल्याचे दिसून येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.