पेठ, (वार्ताहर)- पेठ (ता. आंबेगाव) येथील वलखेडवस्ती येथे गेल्या सहा महिन्यांपासून 63 केव्हीए क्षमतेचे रोहित्र उभारले आहे; पण त्याला विद्युतभार न दिल्याने महावितरणच्या गलथान आणि भोंगळ कारभार समोर आला आहे. उभारलेल्या रोहित्रावरून वस्तीवरील अनेक घरांना पूर्ण दाबाने विद्युत पुरवठा कधी होणार, असा प्रश्न वस्तीवरील नागरिक विचारत आहेत.
वलखेडवस्ती येथील घरगुती विद्युत कनेक्शन्स ही शेती पंपाच्या लाइनवरून जोडली आहेत त्यामुळे वलखेड वस्तीवरच्या नागरिकांना म्हणावा तसा पूर्ण दाबाने विद्युत पुरवठा होत नाही. यामुळे वलखेडवस्तीवरील अनेक विद्युत घरगुती विद्युत उपकरणांनेचे नुकसान होत आहे. वलखेडवस्तीवरील नागरिक कमी दाबाच्या समस्येने त्रस्त झाले आहे.
त्यामुळे वस्तीवरच्या नागरिकांच्या मागणीनुसार नवीन विद्युत रोहित्र मंजूर झाले वस्तीवरच्या अनेक नागरिकांनी आणि शेतकर्यांनी विद्युत रोहित्र आणि लाईन उभारण्यासाठी सहकार्य करून आपली जागा सुद्धा दिली पण उभारलेल्या नवीन रोहित्रला विद्युत भार जोडला नसल्यामुळे हे विद्युत रोहित्र गेल्या सहा महिन्यापासून बंद अवस्थेत आहे.
नवीन रोहित्रावरून वलखेडवस्तीवर तातडीने घरगुती विद्युत कनेक्शन जोडण्यात यावी, अशी मागणी वस्तीवरील दिलीप पवळे, शिवाजी पवळे, शरद पवळे, नरेंद्र पवळे, शांताराम पवळे आदी नागरिकांनी केली आहे.
महावितरणच्या गलथानपणामुळे डीपीला येणारी मेन लाइन चुकीच्या लाइनला जोडण्याचे काम झाले. त्यामुळे आजपर्यंत घरगुती विद्युत समस्याने वस्तीवरील नागरिक त्रस्त आहे. हे काम करूनही काहीच फायदा झाला नाही. चुकीच्या पद्धतीने काम होत असेल तर काम तेव्हाच का थांबवलं नाही. -संजय पवळे, ग्रामपंचायत सदस्य पेठ
वलखेडवस्ती येथील घरगुती कनेक्शन, विहिरी, बोअरवेल किंवा अन्य सर्व प्रकारचे विद्युत कनेक्शन्स शेतीसाठी असणार्या रोहित्रावरून दिल्यामुळे वस्तीवरील विजेची समस्या तीव्र आहे. वीज प्रश्नावरून लोकभावना अतितीव्र आहे. मागणी जास्त, पुरवठा कमी अशी परिस्थिती असल्यामुळे नवीन रोहितरावरून तात्काळ वीज पुरवठा करण्यात यावा.-दिलीप पवळे, उपजिल्हाप्रमुख शिवसेना उबाठा गट
प्रथम एक्सप्रेस फीडर नसल्यामुळे त्याप्रमाणे सर्वे देण्यात येऊन त्यानुसार काम झाले आहे; परंतु नंतर एक्सप्रेस फिडर झाल्यामुळे वलखेड वस्तीला एक्सप्रेस फिडरवर घेता येत नाही. वरिष्ठ कार्यालयाला फेर प्रस्ताव पाठवला आहे, ते काम लवकरच मार्गी लागेल. -श्रुती गंगा, कनिष्ठ अभियंता महावितरण पेठ