भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा गेली काही वर्षे नवखा असल्यासारखा फलंदाजी करताना दिसत होता. मात्र, वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत त्याचा नवा अवतार दिसला. आत्मविश्वासाने परिपूर्ण रोहित खराखुरा हिटमॅन असल्याचेही सिद्ध झाले.
गेल्या दोन वर्षांपासून ज्या पूलच्या फटक्याने त्याला त्रस्त केले होते, तेच फटके आपली हुकूमत असल्याचेच त्याने या कसोटीच्या पहिल्या डावातील खेळीत दाखवून दिले. जेसन होल्डरला फटकावलेला ऑन ड्राइव्ह पूलचा षटकारच खूप काही सांगून गेला. या डावात त्याने अर्धशतक फटकावले.
ही खेळी त्याने खेळली असे म्हणण्यापेक्षा रचली असे म्हणायला हवे. कारण त्याने नवोदित सलामीवीर यशस्वी जयस्वालला फलंदाजीची जास्तीत जास्त संधी दिली. एकेरी धावा घेत त्याने स्ट्राईक रोटेट केली व गोलंदाजांना स्थिरावू दिले नाही. हेच त्याला गेल्या काही काळापासून करता येत नव्हते. तो धावांच्या पस्तीशीत किंवा चाळिशीतच बाद होत होता. त्याच्या तंत्रात दोष नव्हता, तर त्याची फटक्यांची निवड चुकत होती.
कोणत्या गोलंदाजाला जपून खेळायला हवे किंवा कोणत्या गोलंदाजाविरुद्ध धोका पत्करायला हरकत नाही हेच त्याला ठरवता येत नव्हते. मात्र, कॅरेबियन भूमीवर पाऊल ठेवल्यापासून त्याच्या नेटमधील सरावातूनच एक वेगळा रोहित समोर येत होता व प्रत्यक्ष सामन्यातही त्याने तेच दाखवून दिले.
चेंडू खेळताना त्याचे पाय चेंडूच्या टप्प्यापर्यंत येऊ लागले, डोके स्थिर राहू लागले, त्याचे फुटवर्क जबरदस्त अचूक बनले व कुठेतरी हरवलेला रोहित प्रकट झाला. त्याच्या याच स्वरूपाच्या फलंदाजीची आपल्याला सवय होती. विराट कोहलीसारखा तोदेखील नवख्या फलंदाजासारखा बाद होताना पहावत नव्हते.
आंतरराष्ट्रीय सामने असोत किंवा आयपीएल स्पर्धा, रोहितचा खरा अवतार कुठेही दिसत नव्हता व त्याचाच त्रास चाहत्यांना जास्त होत होता. आता आत्मविश्वासाने खेळलेल्या या एका खेळीच्या जोरावर हिटमॅनचा खरा अवतार अवतरला असे म्हणायला हरकत नाही.