मुंबई: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात 303 धावा करणाऱ्या रोहित शर्माने आयसीसीच्या
सर्वोत्कृष्ट क्रमवारीमध्ये स्थान मिळवले आहे. रोहित शर्माने कसोटी रॅंकिंगमधील टॉप 20 मध्ये स्थान पटकावले आहे. विशाखापट्टणमध्ये लागोपाठ दोन शतके झळकावून तसेच एकूण 303 धावा करणाऱ्या रोहित शर्माला क्रमवारीत मोठा फायदा झाला आहे. तसेच आक्रमक सलामीवीर म्हणून त्याच्या नावावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रोहित शर्मा पहिल्यांदाच सलामीला खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. दक्षिण आफ्रिकेच्या संघाविरुद्ध खेळताना रोहितने दोन्ही डावात दणदणीत शतक झळकावले आहे. दोन्ही डावात शतक ठोकणारा रोहित जगातील पहिला फलंदाज बनला आहे. रोहितच्या आधी अशी किमया कोणत्याही खेळाडूला साधता आली नव्हती. एका सामन्यात दोन शतके झळकावल्यामुळे रोहित शर्माच्या कसोटी क्रमवारीत सुधारणा झाली असून तो आता 17 व्या स्थानावर पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 203 धावा करून भारताच्या विजयात मोठा सहभाग नोंदवणाऱ्या मयंक अग्रवालला सर्वोत्कृष्ट कसोटी क्रमवारी मिळाली आहे.
भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण वाटा उचलणाऱ्या मयंक अग्रवालने दुहेरी शतक ठोकले होते. त्यामुळे पहिल्या कसोटीत भारताचा विजय होऊन भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मयंक अग्रवाल 64 व्या रॅंकिंगवर होता तो आता त्याच्या सर्वोत्कृष्ट 25 व्या स्थानावर पोहोचला आहे. रोहित शर्मा आधी 54 व्या स्थानावर होता. तो आता थेट 17 व्या स्थानावर पोहोचला आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली जानेवारी 2018 नंतर 900 अंकांच्या खाली (899) आला आहे. विराट कोहली कसोटी क्रमवारीमध्ये स्टीव्ह स्मिथच्या नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. स्मिथ आणि विराट यांच्यात 38 गुणांचे अंतर आहे.
फिरकीपटू रवीचंद्रन अश्विन याने अफलातून कामगिरी करून क्रमवारीत पुन्हा एकदा झेप घेतली आहे. त्याने आता गोलंदाजांच्या यादीत टॉप टेनमध्ये स्थान मिळवले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 8 गडी बाद करणाऱ्या अश्विन आता दहाव्या स्थानावर पोहोचला आहे. तर अष्टपैलू म्हणून त्याने टॉप 5 मध्ये स्थान पटकावले आहे. महंमद शामी 18 व्या स्थानावरून 14 व्या स्थानावर पोहोचला आहे. तर रवींद्र जाडेजा दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.