तामिळनाडुत होणार दोन्ही नेत्यांमध्ये अनौपचारीक चर्चा
नवी दिल्ली – चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हे येत्या 11 ऑक्टोबर पासून दोन दिवसांच्या भारत भेटीवर येत आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर त्यांची अनौपचारीक चर्चा होणार आहे. या चर्चेत कोणताही नवीन करार होणार नाही किंवा दोन्ही देशांच्यावतीने संयुक्त निवेदनही जारी केले जाणार नाही असे सांगण्यात येत आहे.
भारत आणि चीन या दोन देशाच्या सर्वोच्च नेत्यांमध्ये थेट संपर्क व्हावा आणि त्यांच्यात आपसातील महत्वाच्या विषयांवर थेट चर्चा व्हावी हा या भेटीचा प्रमुख उद्देश आहे असे भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातर्फे सांगण्यात आले आहे. दोन्ही नेत्यांमधील ही दुसरी अनौपचारीक शिखर बैठक आहे.
शी जिनपिंग आणि मोदी हे तामिळनाडुतील मल्लापुरम या ठिकाणी एकमेकांशी चर्चा करणार आहेत. या चर्चेत काश्मीरचा विषय उपस्थित होणार काय असे विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्यांना विचारले असता ते म्हणाले की काश्मीर प्रश्नावर चीनने आपली भूमिका या आधीच स्पष्ट केली आहे. त्यावर भारताची भूमिका मोदी हे त्यांना समजाऊन देतील.
या चर्चेत दोन्ही देशांमधील व्यापार, राजकीय संबंध, दहशतवादाचा मुकाबला या मुद्द्यावरही चर्चा अपेक्षित आहे. दोन्ही देशांच्या सीमेवर शांतता आणि स्थीरता कायम राखण्यावरही यावेळी भर दिला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.