लाहोर :- भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याला पाकिस्तानचा डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रीदी याची गोलंदाजीच झेपत नाही, असे परखड मत पाकिस्तानचा माजी आंतरराष्ट्रीय वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने व्यक्त केले आहे.
शाहीन गोलंदाजी करत असताना त्याच्या हातात चेंडू कसा पकडलेला आहे. तो क्रॉस सीम आहे की नाही तसेच चकाकणारी बाजू नक्की कोणत्या दीशेला आहे हे ओळखण्यात रोहित सातत्याने चुकत आहे. शाहीनचे आऊट स्विंग व इन स्विंग त्याला झेपतच नसल्याचे स्पष्ट दिसते. रोहित सर्वोत्तम फलंदाज आहे यात शंका नाही मात्र, त्याने सर्वोत्तम गोलंदाजाविरुद्धच जबाबदारीने धावा करणे गरजेचे आहे, असेही शोएब म्हणाला.
रोहितने या स्पर्धेसाठी तयारी करत असताना तसेच नेटमध्ये सराव करत असताना सातत्याने डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांच्या गोलंदाजीवर सराव केला आहे. मात्र, तरीही त्याला शाहीनच्या गोलंदाजीतील बदल लक्षात येत नाहीत. इन स्विंगवर त्रिफळाबाद होताना रोहितला मी अनेकदा पाहीले आहे.
कोणता चेंडू बाहेर जाणार आहे किंवा आत येणार आहे हे समजून घेण्याची एक पद्धत असते, गोलंदाजाने त्याच्या हातात चेंडू कसा पकडलेला आहे यावर लक्ष ठेवले तर कोणत्याही स्विंग गोलंदाजीचा सामना करणे शक्य होते. मात्र, इथेच रोहित सातत्याने चुकत आहे. त्याने लवकरात लवकर यावर तोडगा काढला नाही तर त्याचे अपयश असेच संघासाठी नुकसानकारक ठरत राहील, असेही शोएबने म्हटले आहे.
रिलीज ओळखणे कठीण असते…
फलंदाजी करत असताना गोलंदाजाने चेंडू हाती घेतल्यावर रनअप सुरु केल्यावर लगेचच त्याचा अंदाज लावणे कठीण असते. मात्र, त्याच्या चेंडूच्या रिलीजवर लक्ष ठेवले तर फलंदाजी सुकर होते. तसे पाहीले तर जे गोलंदाज दोन्ही हातांनी चेंडू लपवून धावत येतात त्यांचा रिलीज ओळखणे अत्यंत कठीण असते. या क्षेत्रात रोहितला अभ्यास करण्याची व आपल्याच बाद होण्याच्या पद्धतीचे रेकॉर्डिंग पाहून त्यानुसार खेळात सुधारणा करण्याची गरज आहे, असेही शोएबने सांगितले.