पुणे – आर.एम. धारिवाल फाउंडेशनच्या वतीने रविवारी (10 सप्टेंबर) रसिकलालजी एम. धारिवाल स्थानक भवन यश लाॅन्स, बिबवेवाडी येथे सायंकाळी 4 ते 5 वाजताच्या दरम्यान “श्री उवसग्गहरं स्तोत्र”च्या सामूहिक पठणाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. नियोजित वेळेत लहान-थोर, जैन-अजैन सर्वांनी या महामंगलकारी स्तोत्र पठणात सहभागी व्हावे, पुरूषांनी सफेद तर महिलांनी केशरी वस्त्र परिधान करणे अनिवार्य आहे, अशी माहिती फाऊंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारिवाल बालन व उपाध्यक्षा शोभा रसिकलालजी धारिवाल यांनी दिली आहे.
“श्री. उवसग्गहरं स्तोत्र” च्या सामूहिक पठणाचे यावर्षीचे हे सातवे वर्ष आहे. डाॅ साध्वी कुमुदलताजी म.सा. आदिठाणा-4 यांच्या उपस्थितीत हे संगीतमय सामूहिक स्तोत्र पठण होणार आहे. दरम्यान, जैन धर्मियांमध्ये महामंगलकारी समजल्या जाणाऱ्या श्री उवसग्गहरं स्तोत्राच्या सामुहिक पठणाचा प्रथम कार्यक्रम 2017 मध्ये रसिकलालजी धारिवाल यांच्या उपस्थितीत संपन्न झाला होता. तसेच 2018मध्ये भारतगौरव, शांतीदुत जैन दिगंबरमुनी, आचार्य श्री. पुलकसागरजी महाराज यांच्या मंगल सान्निध्यात 10 हजार जैन अजैन भाविकांच्या उपस्थिती मध्ये संपन्न झाला होता. तर 2019 मध्ये जैन आचार्य सम्राट डॉ. शिवमुनीजी म.सा. यांच्या उपस्थितीत 15 हजार जैन अजैन यांच्या उपस्थितीत संपन्न झाला होता. 2020मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता यूट्यूब द्वारे पू. रमणीक मुनिजी तर 2021 मध्ये पू. तारक ऋषीजी यांच्या उपस्थितीत हजारो लोकांनी घरी राहूनच ऑनलाईन उवसग्गहरं स्त्रोत्राचा लाभ घेतला होता. 2022 मध्ये उपप्रवर्तिनी महासती श्री सुमित्राजी म. सा. यांच्या उपस्थितीत संपन्न झाला होता.
श्री उवसग्गहरं स्तोत्राच्या नियमित स्मरणामुळे दृष्टग्रह, रोगपिडा, शत्रु आदि सांसारिक दुःखपिडा दुर होतात व मनुष्य प्राणीमात्रामधे सुख समृद्धी प्राप्त होते अशी धारणा आहे.