पिंपरी, (प्रतिनिधी) – शिव शंभो महादेव प्रतिष्ठानच्या वतीने एस.एम.एस कॉलनी दापोडी येथे महादेव मंदिराचा कलशारोहण कार्यक्रम पार पडला. कलशारोहणानिमित्त दोन दिवस चाललेल्या कार्यक्रमामध्ये प्रथम महाशिवरात्री निमित्त भजन होम हवन व कीर्तनाचा कार्यक्रम करण्यात आले.
दुसऱ्या दिवशी कलशारोहण कार्यक्रम माजी नगरसेवक संजय काटे यांच्या हस्ते करण्यात आला. महाअभिषेक संतोष काटे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दापोडी येथे कलश मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत बाल वारकरी व सोलापूर येथून आलेल्या वारकऱ्यांनी विशेष सहभाग घेतला होता. ढोल ताशा व सनई-चौघडा वादनाचा कार्यक्रम करण्यात आला. यानंतर सकाळी ह भ प मोरे महाराज यांचे कीर्तन झाले.
अध्यक्ष ज्ञानबा नरसिंहे, अरुण बेलसुरे, हर्षवर्धन गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी धनराज ढोले अध्यक्ष यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सूत्रसंचालन ज्ञानबा नरसिंहे यांनी केले तर आभार प्रदर्शन संदीप नरसिंहे यांनी केले.