पिंपरी, (प्रतिनिधी) – इलेक्ट्रिक साहित्य ठेवलेल्या गोडाऊनला भीषण आग लागली. ही घटना सोमवारी (दि. 11) मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास घडली. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.
अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नरसिंग निवृत्ती नरवटे यांचे नम्रता इलेक्ट्रिक्स अँड केबल हाऊस नावाचे टॉवर लाईन जवळ इलेक्ट्रिक दुकान आहे. सोमवारी मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास त्यांच्या गोडाऊनमध्ये आग लागली. घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड अग्निशमन दलाचे सर्व बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यासह टाटा कंपनी, बजाज कंपनी तसेच एमआयडीसीचे बंब देखील घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले.
गोडाऊन मधून धूर येत असल्याने जेसीबीच्या सहाय्याने सर्व साहित्य बाजूला करुन आग पूर्णपणे विझवली जाणार आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र ही आग इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटने लागली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. रात्रीच्या वेळी गोडाऊनमध्ये कोणीही नसल्याने सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
गोडाऊनमध्ये इलेक्ट्रिक केबल, बोर्ड आणि इतर सामान ठेवलेले होते. हे सर्व साहित्य आगीत जळाले आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. इलेक्ट्रिक साहित्याच्या गोडाऊनलगतच्या खोल्यांमध्ये दोन कुटुंब राहण्यास आहेत. आग लागल्याचे लक्षात येताच या खोल्यामधील रहिवासी त्वरीत बाहेर पडले. त्यामुळे कोणलाही इजा झाली नाही.