पुणे कंटोन्मेंट बोर्डाच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची निर्मिती
पुणे – पुणे कंटोन्मेंट बोर्डाच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने तयार केलेला रोबोट बोर्ड प्रशासनाकडे सुपूर्द केला आहे. “रोबोवॉरियर’ असे या रोबोटचे नाव आहे. या रोबोटची रुग्णालयाकडून चाचणी घेण्यात येणार असून, येत्या काळात हा रोबोट रुग्णांच्या सेवेत तैनात करण्यात येणार आहे.
बोर्डाच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने करोनाची प्राथमिक चाचणी करणाऱ्या रोबोटची निर्मिती केली आहे. संस्थेकडून हा रोबोट बोर्डाचे विशेष कार्यकारी अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आला.
बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालय प्रशासनाकडून याची चाचणी घेण्यात येणार आहे. हा रोबोट नागरिकांचे थर्मल स्क्रिनिंग करणार असून, नागरिकांच्या शरीरातील तापमानाची नोंद करणार आहे. याशिवाय रुग्णाला ताप आहे का, परदेश प्रवास केला होता का, आदी प्राथमिक प्रश्न विचारणार असून, याबाबतचे विश्लेषण करणार आहे. यापूर्वी देखील डॉ. आंबेडकर मेमोरियल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने तयार रुग्णालयामध्ये सेवा देणाऱ्या रोबोटची निर्मिती केली होती.