विविधा : निर्भयता 

प्रत्येक जीव हा कोणत्या ना कोणत्या तरी अनामिक भीती आणि दडपणाखाली जगत असतो. त्यामुळेच माणसाला स्वच्छंद जीवनाचा मुक्‍त आनंद घेता येत नाही. अशा वेळी आपले साधू संत, सत्पुरुष, सद्‌गुरू हे आपल्याला हेच सांगत आणि शिकवित असतात की “बाबा रे! तू नि:शंक हो, निर्भय हो. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.’

“भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ या स्वामी समर्थ यांच्या वचनाचा इथे शाब्दिक अर्थ घ्यायचा नसतो. तर त्या मागचा गुढार्थ लक्षात घ्यायचा असतो. तो गुढार्थ असा आहे की, तू तुझ्या समोर येणाऱ्या प्राप्त परिस्थितीला धिराने सामोरा जा. घाबरून संकटाकडे पाठ न फिरवता तू त्याला सामोरा गेलास की संकट तुझ्याकडे पाठ फिरवेल. पण तेच जर तू घाबरलास, मागे फिरलास, कचरलास तर ते संकट तुझा घात करील. निर्भय होणे नितांत गरजेचे असते.

इथे स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली गोष्ट आठवते, ते सांगतात- “मी एकदा असाच एका गावातून दुसऱ्या गावात जात असताना अशा एका वाटेने चाललो होतो की तिथे दूरवर कोणाचीच साथ सोबत नव्हती. मी त्या वाटेने थोडासा पुढे गेलो असेन नसेल तोच मला काही भली मोठी माकडे माझ्या दिशेने येताना दिसली. मी एकटा त्यात माझ्याकडे हातातल्या काठीशिवाय अन्य काहीच नव्हते. काय करायचे? प्रसंग तर मोठा बाका होता. मी घाबरून गेलो. काय करायचे ते सुचेना, ती माकडांची टोळी पुढेपुढे येऊ लागली. भयाने माझे अंग थरथर कापू लागले. तोच दूरवर एक साधू दिसला.

त्याने ओरडून सूचना दिली, “घाबरू नकोस, भिऊ नकोस, त्यांना बघून पळू नकोस तर धैर्याने सामोरा जा’. तो संदेश ऐकला आणि सर्वशक्‍ती एकवटून मी हातातली काठी उगारून धिराने दोन पावले पुढे टाकली. ते पाहून ती माकडे मागच्यामागे पळून उंच झाडावर जाऊन बसली, माझी प्रवासाची वाट मोकळी झाली.

या अशा गोष्टी केवळ वाचून सांगून विसरायच्या नसतात, तर अचानक पुढे आलेल्या संकटाला पाठ न दाखवता, घाबरून न जाता, निर्भय होऊन त्याच्याशी सामना करायचा असतो. मग ते संकट वैयक्‍तिक असो कौटुंबिक असो वा सद्यःपरिस्थितीसारखे सामाजिक नाही तर वैश्‍विक असो. एकच संदेश लक्षात ठेवायचा “भिऊ नका, मागे फिरू नका, तर लढा.

– माधव विद्वांस 

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.