तालुक्यात आठच डेंग्यूचे रुग्ण : अभिराज सूर्यवंशी
तालुक्यात आम्ही महिन्यापूर्वीच डेंग्यूसह इतर आजारांचे
सर्वेक्षण केले आहे. हवामानातील बदलामुळे थंडी-ताप, सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत. आता पुन्हा तालुक्यात सर्वेक्षण सुरू केले असून, आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन डेंग्यूबाबत माहिती देत आहेत. तसेच खासगी रुग्णालयांनाही डेंग्यूचा रुग्ण आढळल्यास आरोग्य विभागास कळविण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती आरोग्य अधिकारी अभिराज सूर्यवंशी यांनी दिली.
नेवासा – तालुक्यात सध्या खासगी रुग्णालयांत तापेचा रुग्ण आला की त्याची डेंग्यूची तपासणी केली जाते. तसेच डेंग्यूचे लक्षणे असून, ऍडमीट करून घेतले जाते. तीनचार दिवस उपचार करून पुन्हा नगर येथील रुग्णालयात दाखल करावे लागेल, असे सांगत रुग्णाच्या नातेवाईकाला चिठ्ठी दिली जाते. अशा प्रकारे डेंग्यूच्या नावाखाली पैसे कमावण्याचा व्यवसाय काही रुग्णालयांतून सुरू असल्याचे रुग्णांच्या नातेवाईकांकडून सांगण्यात येत आहे. मात्र याबाबत तालुका आरोग्याधिकारी अनभिज्ञ असल्याचे दिसून येते.
नेवासा तालुक्यात यावर्षी चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे साचलेल्या पाण्यावर डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती झालेली आहे. या डासांमुळे थंडी-तापेच्या रुग्णांत वाढ झाली आहे. मात्र या रुग्णांची खासगी रुग्णालयांकडून लूट होत आहे. थंडीतापेचा रुग्ण दवाखान्यात दाखल झाल्यावर त्याची तत्काळ डेंग्यूबाबतची तपासणी केली जाते. तसेच डेंग्यूचे लक्षणे दिसत असून, तुम्हाला ऍडमीट व्हावे लागेल, असे सांगितले जाते.
डेंग्यू झाल्याचे सांगताच रुग्णाचे नातेवाईक घाबरून जातात. मात्र खासगी डॉक्टर व रक्तपेढी चालकांनी या रुग्णांच्या रक्ताच्या अनेक तपासणी करून पैसे उकळण्याचा धंदा सुरू केला आहे. खासगी रुग्णालयांत डेंग्यूचे रुग्ण वाढत असताना आरोग्य विभागाला याची अद्याप कल्पनाही नसते, असेच दिसून येत आहे.
सध्या डेंग्यूच्या रुग्णाने रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत. तालुक्यातील खासगी रुग्णालयांत कुठलीच सुविधा नसताना देखील डेंग्यू सारख्या आजारावर उपचार केले कसे जातात? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच काही दिवस या रुग्णालयांत उपचार केल्यानंतर अचानक नगर येथील रुग्णालयात रुग्णाला दाखल करावे लागेल, असे सांगितले जाते. याबाबत आरोग्य विभागाशी संपर्क केल्यावर दोन दिवसांत माहिती घेऊन दोषींवर कारवाई करणार असल्याची माहिती तालुका आरोग्याधिकाऱ्यांनी दिली आहे.