सुनीताबाई यांच्यासह प्रमुख भूमिका असलेल्या वंदे मातरम् चित्रपटाचे “एनएफएआय’तर्फे विशेष प्रदर्शन
पुणे – मराठी सिनेरसिकांच्या मनावर भुरळ घातलेल्या वंदे मातरम् चित्रपटाचे विशेष प्रदर्शन अनुभवण्याची संधी लवकरच पुणेकरांना मिळणार आहे. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन आयोजित केले असून, येत्या शनिवारी सायंकाळी 5 वाजता संस्थेच्या सभागृहात हा चित्रपट रसिकांना पाहता येणार आहे.
जन्मशताब्दी वर्षानिमित्त पु.ल.देशपांडे यांना अनोखी मानवंदना देण्यासाठी संग्रहालयाकडून पु.ल. देशपांडे आणि सुनीताबाई यांची प्रमुख भूमिका असलेल्या “वंदे मातरम’ या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या चित्रपटाचे विशेष म्हणजे सुनीताबाई आणि पुलंच्या मुख्य भूमिकेबरोबरच पु.ल.देशपांडे, ग.दि.माडगुळकर आणि सुधीर फडके या तीन दिग्गजांनी प्रथमच एकत्रितपणे चित्रपटासाठी काम केले आहे.
भारताच्या स्वातंत्र्य चळवळ आणि भारत छोडो आंदोलनात सहभागी झालेल्या आणि फारशा माहिती नसलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या कामगिरीवर आधारित असा हा चित्रपट आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक राम गबाले यांनी केले होते. तर सुधीर फडके यांनी गायलेल्या “वेद मंत्रांहून आम्हां वंद्य वंदे मातरम्’ या गीताने सिनेरसिकांच्या मनावर भूरळ घातली होती. या अजरामर चित्रपटांचा रसिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संग्रहालय प्रशासनाने केले आहे.
पुलंचे हार्मोनियमवादन ऐकण्याची संधी
लेखन आणि अभिनयाबरोबरच पुलंना हार्मोनियम वादनाचीही आवड होती. त्यांच्या वादनाची एक दुर्मिळ चित्रफित चित्रपट संग्रहालयाकडे होती. मात्र, अनेक दिवस ही चित्रफित हरवलेली आहे असा समज झाला होता. मात्र, नुकतीच ही चित्रफित पुन्हा सापडली असून, पुलंचे सांगीतिक पैलू उलगडणारी चित्रफितही पुलप्रेमींना पाहता येणार आहे.