लोणी धामणी -देशाबरोबरच राज्यात लॉकडाऊन सुरू होऊन जवळपास एक महिना होऊन गेला आहे. पर्यायाने पुणे जिल्ह्यात अनेक तालुक्यात रस्त्यांची कामे रेंगाळली आहेत. आंबेगाव तालुक्यासह तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक कामे लॉकडाऊनमध्ये “जैसे थे’ आहेत. सध्या या रस्त्यांवर वाहतूक नसल्याने रस्त्यांची कामे सुरू केल्यास ती मार्गी लागतील.
पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण झाली नाहीत, तर खडी बाजूला जाऊन रस्त्यांची मात्र वाट लागेल तेव्हा ही कामे त्वरीत पूर्ण करावीत अशी मागणी सरपंच सागर जाधव व लोणी-धामणी (ता. आंबेगाव) परीसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
लोणी ते धामणी फाटा व धामणी खिंड-ज्ञानेश्वर मंदिर ते निरगुडसर फाटा या रस्त्याचे काम लॉकडाऊन अगोदर जोरात सुरू होते. त्यावेळी रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात आले. लोणीच्या बाजूने खंडोबा फाट्यापर्यंत एका बाजूने कारपेट डांबरीकरण सुध्दा करण्यात आले. याच दरम्यान लॉकडाऊन जाहीर झाला व काम बंद करण्यात आले. येणाऱ्या आठ दिवसांत जर हे काम सुरू करण्यात आले तर पावसाळा सुरू होण्याअगोदर काम पूर्ण होईल. नाहीतर हे काम ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये पूर्णत्वास जाईल असे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले.