सांगवी – नवी सांगवीत सध्या पाच ते दहा मोकाट जनावरे गटागटाने रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून उभा असतात. जणू काही त्यांनी रोड शो भरविला आहे. या मोकाट जनावरांमुळे वाहनांना तसेच पादचाऱ्यांना ये-जा करताना अडथळा येत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून महापालिकेकडे तक्रारी करूनही मोकाट जनावरांचे कळप रस्त्यावर दिसतच आहेत.
पावसाळी दिवस असल्यामुळे रस्ते निसरडे होतात. नागरिकांना या मार्गांवरून प्रवास करताना मोकाट जनावरांचा सामना करावा लागत आहे. मुख्यत्वे माहेश्वरी चौक ते एम. एस. काटे चौक, तसेच काटेपूरम चौका दरम्यान या जनावरांचा कळप रस्त्यावर दिसतो. याच चौका दरम्यान न्यू मिलेनियम शाळा असल्याने विद्यार्थी, शिक्षक व पालकांना या जनावरांचा दररोज त्रास सहन करावा लागत आहे. ही जनावरे नागरिक व वाहनांनाही घाबरत नाहीत. नागरिकांनी हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला तर वेळप्रसंगी अंगावरही धावून येतात. दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना नियमित हा अडथळा पार करीत वाहन चालवावे लागते. अशावेळी अपघात होण्याची दाट शक्यता आहे. मोकाट जनावरांचा धोका वाहनचालकांबरोबरच ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांनाही आहे. महापालिकेने अशा मोकाट जनावरांच्या तावडीतून नागरिकांची सुटका करावी, अशी मागणी होत आहे.
सकाळी लोक व्यायामाला जाताना, कामाला जाताना, मुलांना शाळेला सोडताना तसेच भाजीपाला आणताना मोकाट जनावरांचा सामना करावा लागत आहे. कामाची लगबग सुरू असताना रस्त्याच्या मधोमध उभे असलेली जनावरे अडथळा ठरत आहेत. या जनावरांमुळे वाहतूक कोंडीही वाढत चालली आहे. महापालिकेने या जनावरांचा बंदोबस्त करून नागरिकांची मोकाट जनावरांच्या दहशतीपासून सुटका करावी.
– कैलास बनसोडे, अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना.