शिक्रापुरात रोडरोमिओंचा धुमाकुळ

शिक्रापूर – येथील परिसरात अनेक शाळा व महाविद्यालये व कॉलेज आहेत. तर या ठिकाणी शिक्रापूर, जातेगाव, सणसवाडी, पिंपळे जगताप, तळेगाव ढमढेरेसह अनेक गावांतून शालेय मुले व मुली शिक्षणासाठी येतात. परंतु परिसरातील रोडरोमिओंमुळे युवती, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. रोडरोमिओंवर वचक नसल्यामुळे दिवसेंदिवस त्यांचा धुमाकुळ वाढत आहे.

अनेक दिवसांपासून मुलींचे लक्ष विचलित करण्यासाठी काही मुलांकडून बुलेट गाडीवर गिरक्‍या मारत गाडीतून फटाक्‍याच्या आवाजाचे बार काढत फिरणे, शिट्टया वाजविणे, गाड्या पळविणे, गाणी वाजविणे आदी प्रकार घडत आहेत. सध्या पावसाचे पाणी रस्त्याच्या कडेला साचले गेलेले असल्यामुळे ते पाणी देखील रोडरोमिओंमुळे शालेय मुलांच्या अंगावर उडत आहे. यामुळे अनेक शालेय मुलींसह ग्रामस्थांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. विद्यालयाच्या बाहेर टवाळक्‍या करत फिरणाऱ्या तसेच दुचाकीच्या गिरक्‍या मारणाऱ्या युवकांवर व मुलांवर कारवाई करावी, असे पत्र आम्ही शिक्रापूर पोलीस स्टेशनला दिल्याचे प्राचार्य रामदास शिंदे यांनी सांगितले.

शिक्रापूर येथील विद्याधाम प्रशाला शाळा, कॉलेजबाहेर गिरक्‍या मारणाऱ्या युवकांवर कारवाई करण्याबाबतचे पत्र मिळालेले आहे. सध्या पोलिसांकडून कारवाई सुरु आहे. तसेच यापुढे देखील कारवाई करणार असून वेळप्रसंगी गुन्हे दाखल करणार आहे.

– सदाशिव शेलार, पोलीस निरीक्षक, शिक्रापूर.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.