पुणे – देशाची सीमा अधिक सुरक्षित करण्यासाठी बॉर्डर रोड ऑर्गनायजेशनने (बीआरओ) विविध प्रकल्प हाती घेतले आहे. सध्या 12 बोगद्यांचे काम सुरू केले आहे. यातील काही बोगद्यांचे काम पूर्ण झाले आहे. तर, काहींचे काम 50 टक्क्यांहून अधिक झाल्याची माहिती ‘बीआरओ’ महासंचालक राजीव चौधरी यांनी शनिवारी दिली.
‘बीआरओ’च्या 64 व्या स्थापना दिनानिमित्त पुण्यातील दिघी कॅम्प येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. चीफ इंजिनियर आणि इक्युपमेंट मॅनेजमेंन्ट कॉन्फरन्सच्या उद्घाटनाप्रसंगी चौधरी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अरुणाचल प्रदेशातील बालीपुरा ते तवांग रस्त्यावरील 500 मीटर लांबीचा ‘निचिफू’ बोगदा तयार आहे. याच रस्त्यावर ‘शेला’ बोगदा जूनपर्यंत पूर्ण होईल. हा देशातील सर्वांत उंचीवरील बोगदा असणार आहे.
केंद्र शासनाने नुकतीच ‘शिकुंला’ बोगद्याची घोषणा केली. हिमाचल प्रदेशातील निमु-पदुम-दारचा या मार्गावर 4.1 किमीचा बोगदा असेल. यामुळे झस्कार येथील 36 गावे जोडली जाणार आहेज. 15 हजार 885 फूट उंचीवर हा बोगदा असणार आहे. सध्या चीनमधील “नीला’ बोगदा हा सर्वात उंच असून 15 हजार 500 फूट उंचीवर आहे. पूल उभारणीतही तीनपट वाढ झाल्याचे चौधरी म्हणाले.
2022-23 च्या आर्थिक वर्षात ‘बीआरओ’ने रस्ते, पूल आणि बोगदे बनविण्यासाठी 12 हजार 340 कोटी रूपये खर्च केले आहेत. मागील पाच वर्षांत आम्ही भारत आणि चीन सीमेलगत 6500 किलोमीटरचे रस्ते बनवून पुर्ण केले आहेत. तर आता 6100 किलोमीटरच्या रस्तांचे काम सुरू आहे, अशी माहिती ‘बीआरओ’चे महासंचालक राजीव चौधरी यांनी दिली.
सीमेलगत रस्ते बांधकामाचे फायदे
- कनेक्टेव्हिटी वाढली असून सुरक्षा विभागांना विविध सामग्री नेण्यास मदत
- सीमेवरील गावांतील नागरिकांचे स्थलांतर थांबले
- शासनाच्या विविध सुविधा सहजतेने जाण्यास सुरुवात
- ग्रामीण नागरिकांचे दळणवळण सुलभ.