-->

कोरोनाच्या भितीने कोपरगाव तालुक्यातील रस्ते केले बंद 

कोपरगाव:  कोरोनाचा संसर्गजन्य प्रादुर्भाव देशासह राज्यात वाढत आहे. त्याची लागण जिल्ह्यातील नागरीकांना झाली आहे. कोरोनाचा संसर्ग कोपरगाव तालुक्यात वाढू नये म्हणुन तालुक्यातील गावागावांना जोडणारे मुख्य रस्ते प्रशासनाने बंद केले आहेत.

शहरातील मुख्य रस्त्यासह उपनगरांना  जोडणारे अनेक रस्ते बंद करून योग्य ती खबदारी घेतली जाते परंतु नागरीक किरकोळ कारणासाठी रस्त्यावर येवून नाहक गर्दी करीत आहेत. किराणा दुकान,पेट्रोल पंप, भाजी ,फळे,दुध घेण्यासाठी एकाच जागी गर्दी करून स्वताःसह इतरांच्या जीवाला धोका निर्माण करुन अनेकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलीस प्रशासन, तहसीलदार, पालीका अधिकारी अनेक कर्मचारी दिवस रात्र आपला जीव धोक्यात घालुन नागरीकांच्या आरोग्य रक्षणासाठी जीवाचे रान करीत आहेत.

आपलं गाव-कुटूंबा पासुन दुर राहुन शासकीय कर्मचारी दुसऱ्यांच्या गावातील नागरीकांचे रक्षण करत आहेत. नागरीकांनी याकडे जानुनबुज दुर्लक्ष करत रिकामटेकडे फिरताना दिसत आहे. लाठी काठीचा प्रसाद देवून पोलीस सुध्दा थकले पण नागरीक घरात बसण्या ऐवजी कट्ट्यावर, चौका चौकात, रस्त्यावर फिरत आहेत. काही महाभाग औषधाचे कारणे पुढे करीत शहरात फिरतात. काही सुज्ञ नागरीक लहान मुलांचे उघडे तोंड ठेवून आजारी आहे असे सांगत जुन्या उपचाराची फाईल सोबत घेत वैयक्तीक कामासाठी फिरत आहेत. रस्ते बंद केले तरी लावलेल्या बांबुच्या खाली वाकुन गाड्या काढत आहेत. असाच प्रयत्न करण्याच्या नादात मार्केट यार्ड शेजारी सुभद्रानगर येथील रस्त्यावर लावलेल्या बांबुला चुकवून जात असताना मोटायसायकल घसरुन एक जेष्ठ दांपत्य पडून गंभीर जखमी झाले. तरी ते त्या अवस्थेत शहरात फिरत होते.

दरम्यान तहसीलदार योगेश चंद्रे,पोलीस निरीक्षक अनिल कटके, राकेश मानगावकर, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे  यांनी आपल्या विभागाचे कर्मचारी तालुक्यातील विविध ठिकाणी पाठवून योग्य ती खबरदारी घेत करोनाची लागण होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे.आरोग्य विभागाचे डॉ. कृष्णा फुलसौंदर, डॉ. संतोष विधाते यांनी तालुक्यातील संपुर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवत तालुक्यातील प्रत्येक घरांची तपासणी करीत आहेत.

देश विदेशासह मुंबई-पुणे आदी ठिकाणाहून नव्याने आलेल्यांची आरोग्य तपासणी करीत योग्य त्या सुचना दिल्या जात आहेत. कोपरगाव तालुक्यात करोना बाधीत एकही रुग्ण नसला तरी देश विदेशासह पुणे मुंबई येथून शेकडो नागरीक आल्याने त्यांच्या पासुन करोना उदभवू नये म्हणुन त्यांना घराबाहेर व घरातील व्यक्त्तीपासुन सुरक्षीत राहण्यासाठी प्रयत्न केला जात आहे तेव्हा नागरीकांनी १४ एप्रिल पर्यंत कोणीही घराबाहेर पडु नये रस्त्यावर गर्दी करू नये असे आवहान प्रशासनाच्या वतिने करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.