वडापुरी – उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी इंदापुर तालुक्यातील २२ गावांना उचलण्याचा निर्णय जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी रद्द केल्यानंतर इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व पीपल्स रिपब्लिकन पक्ष यांनी इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव येथे पुणे सोलापुर हायवे वर टायर जाळत रस्ता रोको केला.
यावेळी सोलापूर जिल्ह्यातील नेत्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या. गेली अनेक वर्ष उजनी धरणातील पाणी इंदापूरला मिळण्याच्या फक्त घोषणा होत असतात.
आताही उजनी तून इंदापूरला पाच टीएमसी पाणी देण्याचे आदेश निघाले मात्र त्याची अंमलबजावणी होण्याआधीच सोलापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी त्याला तीव्र विरोध केला व पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचा निषेध केला
त्या विरोधाची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तो आदेश रद्द करत असल्याचे घोषित केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद इंदापूर तालुक्यात उमटू लागले आहेत.
पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय सोनवणे म्हणाले की जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केलेल्या निर्णयाचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. तसेच पाणी आमच्या हक्काचे असून
आम्ही यापुढे न्यायालयीन लढाई लढून पाणी इंदापूरला मिळवण्याचा प्रयत्न करू. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलेला प्रयत्न सराव पुढच्या लोकप्रतिनिधीने हाणून पाडला परंतु इंदापूर तालुक्यातील जनता दत्तात्रय भरणे यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहवू.
यावेळी इंदापुर पंचायत समिती चे सदस्य सतीश पांढरे म्हणाले की इंदापूर तालुक्याला मिळणारे पाणी आमच्या हक्काचे असून त्यासाठी इंदापूर तालुक्यातील २१ गावांना जलसमाधी मिळाली आहे.
त्यामुळे चुकीची माहिती देऊन घाईगडबडीत काही निर्णय घेणे योग्य नाही. त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार करून इंदापूरला पाणी मिळावे असे सरकारला विनंती करतो. यावेळी परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.