नदीपात्रातील अतिक्रमणे रडारवर

दोन दिवसांत दखल घ्या : पाहणी समितीचा अहवाल


“एनजीटी’ने नेमलेल्या समितीने महापालिकेला बजावले

पुणे – मुळा-मुठा नद्यांच्या पात्रातील व्यावसायिक अतिक्रमणांबाबत राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने (एनजीटी) नेमलेल्या समितीने पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांसह पाटबंधारे खात्यालाही बजावले आहे. नद्यांच्या पात्रात अतिक्रमणे असून, पुढच्या दोन दिवसांत त्याची दखल घ्यावी, असेही या समिती आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे.

मुळा-मुठेच्या पात्रात व्यावसायिक अतिक्रमणे झाली असून, काही व्यावसायिकांनी बांधकामेही केली आहे. दोन्ही शहरांच्या वेगवेगळ्या भागांत नदीत भराव टाकण्यात आला आहे. त्यामुळे नदी पात्राची रूंदी कमी झाली आहे. परिणामी, नदीची वहन क्षमता निम्म्यावर आली असून, त्यामुळे दोन्ही शहरांना पुराचा धोका असल्याची तक्रार “एनजीटी’कडे करण्यात आली होती. त्यावर पाहणी करण्यासाठी नेमलेल्या समितीत जिल्हाधिकारी, पाटबंधारे खाते, प्रदूषण नियंत्रण महामंडळासह पर्यावरण खात्यातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पर्यावरणप्रेमी सारंग यादवाडकर, विवेक वेलणकर आणि दिलीप मोहिते यांनी याचिकेद्वारे “एनजीटी’कडे तक्रारी केल्या होत्या. त्यावरही ही समिती नेमून प्रत्यक्ष पाहणीचा आदेश “एनजीटी’ने दिला होता.

अतिक्रमणांमुळे नदीच्या प्रवाहाला अडथळा निर्माण झाला आहे. अतिक्रमण करून राहात असलेल्या 40 कुटुंबांना पायाभूत सुविधा पुरवल्याचेही दोन्ही महापालिकांच्या निदर्शनास आणून दिले आहे. व्यावसायिक अतिक्रमणांच्या बांधकामामुळे भू-भराव टाकण्यात आल्याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे. या बाबींमुळे पुराची पातळी 50 फुटांपर्यंत वाढल्याचे दिसून आले आहे.

नद्यांचे पात्रच वळवण्याचा प्रताप
या आधीही नदीपात्रातील अतिक्रमणांबाबत “एनजीटी’ने आदेश दिले होते. त्यावेळी नदीकाठावर असलेल्या मंगल कार्यालय आणि अन्य बांधकामांवरही कारवाई करण्यात आली होती. मात्र, आता पुन्हा एकदा ही अतिक्रमणे वाढली असून, काही ठिकाणी तर नद्यांचे पात्रच वळवण्याचा प्रताप करण्यात आला आहे. याबाबतही अनेकदा “एनजीटी’कडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. नदीपात्रात भराव टाकण्याचेही अनेक प्रकार करण्यात आले आहेत. याशिवाय ब्लू-लाइन आणि रेड-लाइन याबाबतही पर्यावरणप्रेमींनी जोरदार आक्षेप नोंदवले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)