माणमध्ये महावितरणकडून शेतकऱ्यांची लूट

पाऊस पडेना, अंदाजे वीज बिलांचा मात्र पाऊस

बिदाल – माण तालुक्‍याच्या उत्तर भागात सात वर्षापासून दुष्काळ असताना महावितरण शेतीपंपांसाठी अंदाजे वीज बिले आकारत आहे. त्यातून शेतकऱ्यांची लूट सुरू आहे.
तालुक्‍यात पिण्याच्या पाण्याचे टॅंकर सुरू आहेत. चारा विकत आणावा लागत आहे. पावसाअभावी तलाव, विहिरी कोरड्या ठणठणीत आहेत. गेल्या सात वर्षांत रिपरिप पावसावर कशीबशी पेरणी केली जात आहे. अशी अवस्था असताना महावितरण मात्र शेतकऱ्यांना अंदाजे बिले देत आहे. माणसांचे जगणे मुश्‍कील झाले असताना जनावरे कशी जगवायची, असा प्रश्‍न पडला आहे.

गेल्या सात वर्षात विहिरी, तलाव भरले नसल्याने शेतकरी मोटारीचे बटणसुद्धा दाबायला गेला नाही. शेतीपंपांचे मीटरसुद्धा बंद आहेत तरीदेखील महावितरण अंदाजे बिले देऊन शेतकऱ्यांना दिवसाढवळ्या लुटत आहे. तीन वर्षापूर्वी शेतीपंपांच्या बिलांची होळी करून महावितरणचा निषेध करण्यात आला होता.त्यावेळी वायरमनला सांगून शेतीपंप व मीटरची पाहणी करतो, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते. मात्र, हे अधिकारी डोळ्यांवर पट्टी बांधून बसले आहेत. या अधिकाऱ्यांनी शेतीपंपांची प्रत्यक्ष पाहणी करून वीज बिले कमी करावीत, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

सततचा दुष्काळ असतानाही महावितरण शेतीपंपांची अंदाजे बिले आकारत आहे. पिण्याच्या पाण्याचे टॅंकर सुरू असताना शेतीला पाणी आणायचे कुठून, असा प्रश्‍न शेतकरी विचारत आहेत. लोकप्रतिनिधी, राजकीय नेते फक्‍त निवडणुकीपुरते येतात. मात्र, शेतकऱ्यांच्या लुटीकडे त्यांचे लक्ष नसल्याने संताप व्यक्‍त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.