क्रिकेट काॅर्नर : ऋतुराज व पडीक्‍कल पर्यटक आहेत का?

– अमित डोंगरे

क्रिकेटमध्ये आले कर्णधाराच्या मना तिथे कोणाचे चालेना, अशी म्हण तंतोतंत लागू पडत आहे. फक्‍त कर्णधाराच्या जागी प्रशिक्षक असा उल्लेख केला पाहिजे. या मालिकेसाठी भारताचा दुसरा संघ श्रीलंकेत दाखल झाला तेव्हापासून खुद्द प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीच रोटेशन पॉलिसीचा उहापोह केला होता. पण एकदिवसीय मालिका सुरक्षित करत संघात सहा बदल केले गेले व आता पहिल्या टी-20 सामन्यात विजय मिळवल्यावरही संघात बदलांचे संकेत देण्यात आलेले नाहीत.

म्हणजे मंगळवारी होणारा दुसरा टी-20 सामना जिंकून ही मालिकाही सुरक्षित करायची व अखेरच्या तिसऱ्या सामन्यात बदल घडवत आपणच नवोदितांचे वाली आहोत असा संदेश देण्याचा प्रयत्न करायचा. संघातील प्रत्येक खेळाडूला संधी मिळेल याची खात्री नाही देता येणार असे द्रविड म्हणाला होता.

मात्र, पृथ्वी शॉ, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या व भुवनेश्‍वर कुमार यांना संघाबाहेर ठेवत नवोदितांना संधी देण्याची धमक द्रविडनेही दाखवू नये याचे आश्‍चर्य वाटते. आज टी-20 संघात क्रिकेटच्या याच प्रकारातील स्पेशालीस्ट असलेले ऋतुराज गायकवाड व देवदत्त पडीक्‍कल यांना संधी कधी मिळणार हा प्रश्‍न कायम राहिला आहे. हे दोघे भारतीय संघाबरोबर श्रीलंकेत गेले आहेत की एक पर्यटक म्हणून हेच आता समजेनासे झाले आहे.

एकदिवसीय मालिकेनंतर टी-20 मालिकेतही पृथ्वीलाच सातत्याने खेळवण्याचा अट्टहास का केला जात आहे. सूर्यकुमार यादवलाही सातत्याने खेळवले जात आहे. आता या मालिकेदरम्यानच सूर्यकुमार व पृथ्वी यांच्यासह भुवनेश्‍वर कुमारही प्रमुख संघाकडून कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंडला रवाना होणार आहेत. मग त्यांच्या जागी ऋतुराज, पडीक्‍कल तसेच अन्य नवोदित खेळाडूंना संधी का दिली जात नाही याचे उत्तर मिळेल का. एकीकडे रवी शास्त्री यांच्या जागी द्रविडची नियुक्ती करा, अशी ओरड सुरू असताना द्रविडबाबतही आता टीका सुरू झाली आहे.

संघातील सेकंडबेंचला जास्त संधी न देता केवळ प्रमुख खेळाडूंनाच खेळवण्याची त्याची निती अनाकलनीय वाटते. आगामी टी-20 विश्‍वकरंडक डोळ्यासमोर ठेवत नवोदितांना संधी दिली गेली पाहिजे; पण हे द्रविडच्या मनात आले पाहिजे आपल्या मनात येऊन काय उपयोग.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.