सातारा – सध्या धावपळीच्या जीवनात कोणत्याही क्षेत्रात तणाव नाहीत असे होत नाही. यामध्ये तरुण वर्गामध्येही वाढत असलेले मानसिक आरोग्याविषयीच्या समस्यांवर संशोधन करुन त्याचे निकारण शोधण्याचे काम सातार्यातील ऋतुजा राजेंद्र कारंडे करत आहेत. ऋतुजा कारंडे मुंबईतील टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत एम. फिल करत असून ‘मानसिक आरोग्य साक्षरता’ हा त्यांचा संशोधनाचा विषय आहे. याअंतर्गंतच ऋतुजा कारंडे यांनी सातार्यातील महाविद्यालयांमध्ये जावून हजारो विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्यात मानसिक आरोग्याविषयी जनजागृती केली.
मुंबईतील टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत संशोधनाचे काम करत असताना ऋतुजा कारंडे यांनी गेल्या आठवडाभरात सातार्यातील छ. शिवाजी कॉलेज, सायन्स कॉलेज, महिला कॉलेजमध्ये जावून हजारो युवक, युवतींशी संवाद साधला. युवा वर्गात डिप्रेशन, नैराश्य, ताणतणाव, नातेसंबंधातील वाद, अभ्यासाचा तणाव, वयानुसार होणारे शारीरीक बदल, हार्मोनल बदल या समस्यां दिसून येत असून या सगळ्या प्रक्रियांना कसे सामोरे गेले पाहिजे. आपल्या मित्र, मैत्रिणी अशा तणावातून जात असतील त्यांचे मानसिक आरोग्य कसे चांगले राखावे हे युवक, युवतींना माहिती असले पाहिजे यासाठी ऋतुजा कारंडे यांनी विविध महाविद्यालयात जावून मानसिक आरोग्य साक्षरतेबाबत मार्गदर्शन केले.
मुला, मुलांंशी संवाद साधत त्यांना मानसिक आरोग्य चांगले कसे राखावे, मानसिक आरोग्याबाबत कोणत्या समस्या उदभवतात त्यावेळी आपण काय केले पाहिजे याबाबत माहिती दिली. सध्या काळातील ताणतणावांना सामोरे जाताना आपली शारीरीक व मानसिक स्थिती कशी चांगली राखावी व बदलांना कसे सामोरे जावे याबाबत माहिती दिली. युवतींशी संवाद साधून त्यांच्या मनातील शंकांचे निरसनही ऋतुजा कारंडे यांनी केले. यावेळी महाविद्यालयांमधील प्राचार्यांसह प्राध्यापकांनी ऋतुजा कांरडे यांनी केलेल्या जनजागृतीबाबत कौतुक करुन त्यांना पुढील संशोधनासाठी शुभेच्छाही व्यक्त केल्या.