पुणे : करोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता कोविड तपासणी, लसीकरण, सर्वेक्षण यावर विशेष भर देणे आवश्यक आहे. कोविड प्रतिबंधक लशीची दुसरी मात्रा डोस घेणे बाकी असलेल्या सर्व नागरिकांचे येत्या महिनाभरात लसीकरण पूर्ण करावे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.
पुणे ग्रामीण कोविड व्यवस्थापनाबाबत जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्यप्रणालीद्वारे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. जिल्हाधिकारी म्हणाले, कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाने राज्याच्या आरोग्य विभागाच्या सूचनांची गतीने अंमलबजावणी सुरू केली आहे.
कोरोना तपासणी, लसीकरणाचे तालुक्यांनी केलेल्या नियोजनुसार प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात यावी. कोविड प्रतिबंधासाठी “हर घर दस्तक’ मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. कोविड प्रतिबंधक लसीची दुसरी मात्रा घेणे प्रलंबित असलेल्या साडेसहा लाख व्यक्तींचे महिनाभरात संपूर्ण लसीकरण करण्यात यावे.
दि. 12 ते 14 वयोगट तसेच 15 ते 17 वयोगटातील सर्व मुलांचे लसीकरण पूर्ण करण्यात यावे. 60 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना वर्धक मात्रा (बूस्टर डोस) देण्याचे काम पूर्ण करण्यात यावे. त्यासाठी यादीनुसार घरोघरी भेट देऊन लसीकरण करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.