जळगाव – जळगावमधील खंडेरावनगर येथे तरुणीची छेड काढल्यावरून दोन गटात वाद झाला. यावेळी घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांवर दगडफेक करण्यात आल्याने तणाव वाढला. याचवेळी दोन्ही गटाकडून दगडफेक करण्यात आली. या प्रकरणी 29 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून 6 जणांना अटक करण्यात आली आहे.
हा प्रकार शनिवारी रात्री उशिरा घडला. याबाबत माहिती अशी की, खंडेरावनगर परिसरात आझादनगर भागातील एक प्रेमीयुगूल फिरत होते. यातील तरुणीची छेड काढल्याने दोन गटात वाद होत दगडफेकीचा प्रकार घडल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला.
या घटनेची माहिती मिळताच रामानंदगनर पोलीस ठाण्याचे संजय सपकाळे, सुशील चौधरी व प्रवीण जगदाळे हे तीन कर्मचारी घटनास्थळी गेले. यावेळी 50 ते 60 जणांचा जमावाने एकमेकांवर दगडफेक केली.
यात पोलीस कर्मचारी संजय सपकाळे हे जखमी झाले. त्यांनी पोलीस ठाण्यात माहिती देऊन अधिक कुमक बोलावून घेतली. सुमारे पाऊण तास दगडफेक सुरू होती. यानंतर सपकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन्ही गटातील 29 जणांवर रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.