ठोसेघर -करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने सातारा जिल्ह्यात आपत्तीजनक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या पर्यटनास बंदी असल्याने कास, बामणोली, ठोसेघर ही सातारा तालुक्यातील जगप्रसिद्ध पर्यटन स्थळे बंद आहेत; परंतु या स्थळांना पर्याय असलेल्या उरमोडी धरणाच्या निसर्गरम्य क्षेत्राकडे काही हुल्लडबाजांनी टाळेबंदीच्या शिथिलतेनंतर आपला मोर्चा वळवला आहे. येथे मद्यपींचे “ओपन बार’ सुरू असून आडोशाच्या जागा गाठणाऱ्या प्रेमी युगुलांच्या अश्लील चाळ्यांना ऊत आला आहे.
सातारा तालुक्याच्या पश्चिमेकडील ठोसेघर, कास पठार, बामणोली ही निसर्गरम्य पर्यटन स्थळे देशभरासह विदेशी पर्यटक, निसर्ग प्रेमींना भुरळ घालतात; परंतु यंदा करोनाच्या संकटामुळे जिल्ह्यात पर्यटनास तूर्तास बंदी आहे. कास, ठोसेघरबरोबरच निसर्गाने मुक्त उधळण केलेल्या परळी खोऱ्यातील उरमोडी धरण क्षेत्रातही गेल्या काही वर्षांपासून निसर्गप्रेमी, पर्यटकांचा राबता वाढला आहे. टाळेबंदीची नियमावली व पोलीस कारवाईच्या भीतीने रानोमाळ भरणारे तळीरामांचे अड्डे बंद झाले आहेत.
टाळेबंदीमुळे अनेक महिन्यांचा विरह सोसल्यानंतर प्रेमी युगुले एकांतासाठी पर्यायी जागांचा शोध घेत फिरत आहेत. ठोसेघर, कास या मार्गावर होणाऱ्या कारवाया टाळण्यासाठी मद्यपी व प्रेमी युगुलांनी आपला मोर्चा उरमोडी धरण परिसराकडे वळविला आहे. जिल्ह्यात करोनाबाधितांचा आलेख चढता असल्याने आरोग्य व्यवस्थेबरोबर पोलीस यंत्रणेवरील ताण वाढला आहे. या स्थितीत अनावश्यक रानोमाळ भटकणाऱ्या टवाळखोरांना पायबंद घालताना पोलीस दलाची कसरत होत आहेच.
शिवाय करोना संक्रमणाचा धोकाही वाढत आहे. उरमोडी धरण क्षेत्रातील वाढती घुसखोरी प्रशासनासाठी डोकेदुखी ठरली आहे. या भागात रोज होणाऱ्या दारू पार्ट्या व प्रेमी युगलांना चाप बसवणे नितांत गरजेचे असून पोलीस व महसूल यंत्रणेने कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.