नवी दिल्ली : पंजाबच्या मन्सा जिल्ह्यात रविवारी सायंकाळी पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मूसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मूसा या त्यांच्या मूळ गावी काल त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येनंतर एका फेसबुक पोस्टमुळे चर्चेला उधाण आले आहे.
गँगस्टर नीरज बवानाशी संबंधित या अकाऊंटवरुन सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येचा बदला घेण्याचा इशारा देण्यात आला आहे. या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेल्या फेसबुक स्टोरीमध्ये म्हटले गेले आहे कि, “सिद्धू मूसेवाला आपल्याला प्रिय होता, भाऊ होता. दोन दिवसात तुम्हाला निकाल देऊ”.
या पोस्टरमध्ये नीरज बवानाला टॅग करण्यात आले आहे. नीरज बवानावर हत्या आणि खंडणीचे अनेक गुन्हे दाखल असून सध्या तिहार जेलमध्ये बंद आहे. याशिवाय जेलमध्ये असणारे त्याचे सहकारी टिल्लू ताजपुरिया आणि दविंदर भांबिया यांनाही टॅग करण्यात आले आहे.
नीरज बवानाशी संबंधित ही पोस्ट कोणी लिहिली आहे हे नेमकं स्पष्ट होऊ शकलेले नाही. नीरजचे सहकारी दिल्ली, हरियाणा आणि राजस्थानभर पसरलेले आहेत.