मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सोशल मीडियावर कार्टून फॉरवर्ड केल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी एका निवृत्त नौदल अधिकाऱ्याला जबर मारहाण केल्याची घटना मुंबईत घडली आहे. मदन शर्मा असे मारहाण झालेल्या माजी नौदल अधिकाऱ्याचे नाव असून ते मुंबईमध्ये कांदिवली परिसरात राहतात. या मारहाणीत त्यांच्या डोळ्याला मोठी दुखापत झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.दरम्यान, या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सहा शिवसैनिकांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे व्यंगचित्र व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड केल्यामुळे त्यांना कथितरित्या शिवसैनिकांकडून मारहाण झाल्याचा आरोप आहे. शिवसेनेचे दोन शाखाप्रमुख आणि सात ते आठ कार्यकर्त्यांनी शर्मा यांना जबर मारहाण केली, असा आरोप भाजपचे स्थानिक आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. तर हा सर्व प्रकार दुःखद आणि धक्कादायक आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, हे गुंडाराज आवरा, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
कांदिवलीतील समतानगरमध्ये लोखंडवाला कॉम्प्लेक्स परिसरात राहणारे निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. शुक्रवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला.
“मी फक्त व्हॉट्सअॅपवर एक कार्टून फॉरवर्ड केले होते. हीच माझी चूक होती. मला काहीच न बोलता थेट घरात घुसून मला मारहाण करण्यास सुरू केली. तसंच त्यानंतर पोलीसही मला अटक करायला आले, असा आरोप शर्मा यांनी केला. याप्रकरणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्या मदतीमुळे माझी अटक टळली,” असेही शर्मा यांनी म्हटले आहे.