खटाव -शेतकऱ्यांच्या पिकांची नोंदणी महसुली वर्ष 2021-22 पासून फक्त “ई पीक पाहणी’ मोबाइल ऍपद्वारेच होणार आहे. “माझा सात बारा, मीच भरणार माझा पीक पेरा’ ही संकल्पना घेऊन शासन स्तरावरून जागृती करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांनी आपल्या मोबाइलमध्ये ई पीक पाहणी ऍप डाऊनलोड करून, आपल्या शेतातील पिकांची माहिती अचूक भरून, पिकाचा फोटो काढायचा आहे. यापुढे तलाठी कार्यालयामार्फत पीक पेऱ्याची माहिती भरली जाणार नाही. ई-पीक पाहणी मोहिमेस शेतकऱ्यांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन खटावचे मंडलाधिकारी मोहन मोहिते यांनी केले आहे. एका मोबाइल क्रमांकाद्वारे जास्तीत जास्त 20 शेतकऱ्यांची पीक पाहणी नोंदवता येणार आहे.
मोबाइलवर आलेला चार अंकी ओटीपी हा कायमस्वरूपी पासवर्ड राहील. पिकाची नोंदणी ऍपद्वार करताना शेतकऱ्यांसाठी हा पासवर्ड आवश्यक राहील. ई पीक पाहणी ऍपमध्ये पिकांची नोंदणी 30 सप्टेंबरपर्यंत करायची आहे. या मुदतीनंतर पीक पाहणीची नोंद होणार नाही, कारण पुढे रब्बी हंगामातील पिकांची ई पाहणी सुरू होणार आहे. शेतकऱ्यांनी या मुदतीत पिकाची नोंद ई पीक पाहणी ऍपद्वारे करावी, असे मोहिते यांनी सांगितले.