– रामचंद्र सोनवणे
राजगुरूनगर – एकीकडे बैलगाडा शर्यतीला न्यायालयीन बंदी आहे. करोनाचे संकट असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक मंदी आहे. तरीही मैसूर (कर्नाटक) येथून आणलेले बैलगाडा शर्यतीत पळणारे बैल खरेदीसाठी उत्तर पुणे जिल्ह्यातील गाडा शौकिनांची एकच गर्दी आणि खरेदी होत आहे.
गेले पंधरा दिवस दिवसाआड खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात या बैलांचा खरेदी विक्रीचा मुक्त बाजार भरत आहे. एका ट्रकमधून आठ ते दहा बैल आल्यावर ते खरेदीसाठी शौकिन तासन्तास तिष्ठत राहतात; तर गाडी आल्यावर नेमक्या बैलाची निवड करण्यासाठी एकमेकांना ढकला ढकल करतात हे विशेष.
मैसूर येथील याच नावाच्या प्रजातीचे बैल महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीच्या घाटात पळण्यात अव्वल मानले जातात. जवळपास पाचशे ते सातशे किमी अंतरावरून आणलेला हा बैल खरेदीसाठी नावाजलेल्या गाडा मालकांमध्ये म्हणूनच चढाओढ लागते.
बुधवारी राजगुरूनगर येथील बाजार समिती आवारात झालेल्या मैसूर बैल खरेदीसाठी खेड तालुक्यातील दावडीचे सरपंच संतोष गव्हाणे, बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ टाकळकर, काकासाहेब टाकळकर, तिन्हेवाडी सोसायटीचे उपाध्यक्ष बाळासाहेब सांडभोर, बाळासाहेब कोतवाल, राजेंद्र राक्षे, रेटवडीचे सरपंच नामदेव डुबे, तुकाईवाडीचे उपसरपंच साहेबराव गाढवे,
सखाराम गाडेकर, नानाभाऊ आरुडे, रांजणगावचे सरपंच सर्जेराव खेडकर, वडगाव मावळचे रामशेठ वारंगे, भरत बच्चे, जुन्नरचे दिनकर चव्हाण आदी आणि खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर, हवेली व मावळ तालुक्यातील गाडाशौकीन युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शर्यती सुरू होण्याची अपेक्षा
महाराष्ट्र सरकार अध्यादेश काढणार असल्याच्या आशेवर बैलगाडा शर्यती लवकरच सुरू होतील, अशी गाडा शौकिनांची धारणा आहे. महाराष्ट्रीयन खिल्लार, कर्नाटकी मैसूर, हल्लीकर या प्रजातीचे बैल घाटात वेगाने धावतात. महाराष्ट्रात खिल्लार गायी कमी झाल्या आहेत.
शासकीय आकडेवारी नुसार 46 टक्के प्रमाण घटले आहे. त्यामुळे हे बैल उपलब्ध नाहीत. स्पर्धेची पूर्व तयारी म्हणून पर्यायाने मैसूर बैलांना मागणी वाढली आहे. 80 हजार ते एक, सव्वा लाख रुपयांची बोली लावून गाडा शौकीन उत्साहाने बैल खरेदी करीत असल्याचे चित्र दिसत आहे.