#प्रभात_दीपोत्सव_२०२० : संकल्प

– प्रदीप बालगावकर


रिटायर झालो अन्‌ दुसऱ्याच दिवशी एक कथा वाचनात आली. त्या कथेमुळे मी रिटायर झाल्यावर काय करायचं ठरवलं होतं, त्या संकल्पाला बळ मिळालं. तसा माझा संकल्प काही वेगळा नव्हता. सामान्य माणसांचे काही ठराविक संकल्प असतात त्यापैकीच होते. भरपूर वाचन करायचं, फिरायला जायचं, वजन कमी करायचं, शुगर कंट्रोल करायची आणि पैसे मिळवण्यासाठी काही न करता काहीतरी समाजसेवा करायची. 

रिटायर झालेल्या दिवशी पत्नीला हा संकल्प सांगितला तर ती “चांगलं आहे’ एवढंच म्हणाली. मी तिला विचारलं, “तुला आवडला नाही का माझा संकल्प.’ ती स्मित हास्य करत म्हणाली, “हे संकल्प एक आठवडा तरी करून दाखवा. असे संकल्प सगळेच करतात आणि एक टक्‍का लोक पण तो पाळत नाहीत.’
बोलता बोलता तिनं थोडा पॉज घेतला आणि उपरोधिक सुरात म्हणाली, “आणि समाजसेवा म्हणजे काय करणार हो?’ मी गोंधळलो. मी फक्‍त सामाजिक कार्य करायचं ठरवलं होतं; पण नक्‍की काय करायचं ते ठरवलं नव्हतं.

मी म्हणालो, “ते अजून ठरवलं नाही विचार करतोय.’ यावर तिची प्रतिक्रिया. “घरी काहीतरी कामाला मदत करा ती पण समाजसेवाच होईल.’

मी तिचा मूड ओळखला आणि गप्प बसलो. सगळ्या थोर माणसांच्या कार्यात त्यांच्या अर्धांगिनीचा मोठा वाटा असतो. त्या त्यांच्यामागे खंबीरपणे उभ्या असतात तेव्हा ते यशस्वी होतात असं कितीतरी मोठ्या माणसांच्या चरित्रात वाचलं होतं. आपल्या नशिबात ते नाही. तरीही न डगमगता आपला निर्धार न सोडण्याचा मी मनाशी ठरवलं.

पहिल्या दिवशी सकाळी सहाला जाग आली. उठून बसलो. बायको अजून उठली नव्हती. तिला चहा करायला सांगावं म्हणून उठवायला गेलो तर ती म्हणाली, “आज काय गडबड आहे, तुम्ही रिटायर झालाय लक्षात आहे ना?’ “अगं, मी फिरायला जाणार आहे.’

“मग तुमचा तुम्ही चहा करून घ्या. नाहीतर फिरून आल्यावर प्या. मी आजपासून सातला उठणार आहे.’
मी काय करणार? मनात आलं, आपण रोज सकाळी उठत होतोच, आज एक दिवस पहाट झोपेची मजा घेऊन सात साडेसातला फिरायला जाऊ, असा विचार करत झोपलो.
बायको हाका मारतेय, असं वाटलं म्हणून डोळे उघडले तर तीच ओरडत होती. “अहो, उठा, आठ वाजून गेले तुमचा संकल्प पहिल्याच दिवशी मोडला का?’

मी डोळे चोळत उठलो. घड्याळात बघितलं तर साडेआठ वाजत आले होते. फक्‍त दहा मिनिटं झोपायचं ठरवलं तर डोळा कसा लागला कळलंच नाही. विचार करत होतो तर बायकोचा आवाज आला चहा करून ठेवलाय गाळून घ्या आणि प्या. “प्या’चा उच्चार ढोसा असाच होता. तरी मी मन एकवटलं.
पहिला दिवस फेल गेला म्हणून डगमगायचं नाही. आजचा दिवस वाया गेला हरकत नाही. अपयश ही यशाची पहिली पायरी. लहानपणी खेळताना पहिला डाव भुताला किंवा देवाला असं काय तरी म्हणायचो ते आठवलं. थोरामोठ्यांना पहिल्या प्रयत्नात कसं अपयश आलं ते आठवू लागलं आणि धीर धरून निर्णय घेतला आजचा दिवस संपूर्ण विश्रांती घ्यायची आणि उद्यापासून जोमानं फिरायला जायचं.

दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो. सकाळी चहा पिऊ नये, असा एका आहारतज्ज्ञाचा उपदेश आदल्या दिवशीच व्हॉट्‌सऍपवर वाचला होता. चहा न घेता तसाच फिरून आलो. एकदम मस्त वाटत होतं. मी बायकोला म्हणालो, “अगं, बघ किती छान वाटतंय. उद्यापासून तुही येत जा फिरायला.’
ती म्हणाली, “सगळे काय तुमच्यासारखे नशीबवान नसतात. घरची कामं करायला मदत करणार का, मग येते.’

माझा सल्ला माझ्यावरच उलटला होता. गप्प बसणं हाच यावर उपाय होता. दुपारी जेवण झाल्यावर विचार केला एक संकल्प तर सुरू केला आता दुसरा समाजसेवा. काय करावं. काही सुचेना. विचार केला, नंतर ठरवू, गडबड कशासाठी करायची. मित्रमंडळीत कट्ट्यावर चर्चा करून ठरवू.

दुपारी जेवण झाल्यावर बायको टीव्ही बघत बसली होती. मी ठरवलं होतं, तो इडियट बॉक्‍स बघायचा नाही. आपण वाचन करू. वाचनालयातून आणलेलं पुस्तक वाचत बेडवर पडलो. पाच-दहा मिनिटांतच छान झोप लागली. साडेपाच वाजता बायको मला उठवत म्हणाली, “समाजसेवक, चांगली झोप काढलीत. समाजसेवा करून दमलेले दिसता.’

मी तिच्या टोमण्याला उत्तर दिलं नाही. तेव्हाच ठरवलं, समाजसेवेचं पुढं बघू; सध्या सकाळी फिरण्यावर लक्ष केंद्रित करू. तेवढ्यात ती म्हणाली, “अहो, समाजसुधारक, संध्याकाळचे साडेपाच वाजलेत चहा प्या आणि जरा किराणा सामान घेऊन या.’

नकार देण्याचा प्रश्‍नच नव्हता. सामान घेऊन येताना वाचनालयातून एक मासिक आणलं. भरपूर वाचन करायचं हा एक संकल्प होताच. रात्री जेवण झाल्यावर मासिक वाचायला घेतलं. त्यातली एक छोटी अनुवादित कथा आवडली. कथा वाचून झोपताना मनात आलं की असं आपल्या आयुष्यात घडलं तर काय मजा येईल. तेव्हाच ठरवून टाकलं की प्रयत्न करायचा.

रात्री केलेल्या प्लॅनप्रमाणं उत्सुकतेपोटी वेळेवर उठलो. चहा न घेताच बाहेर पडलो. वातावरण चांगले होते. आपलं नशीब नक्‍की साथ देणार असं वाटत होतं. बागेत गेलो. जरा सावध नजरेनं निरखीत चाललो. मनात थोडी भीतीही होतीच. आपला इरादा कोणी ओळखला तर आफतच येणार होती. त्यामुळे अधिकच दक्षता घेत होतो. जवळजवळ एक तास फिरूनही काही मनासारखं झालं नाही.

बाकावर बसून अर्धा तास विश्रांती घेतली. घरी आलो तर बायको म्हणाली, “कोणी भेटलं वाटतं एवढा वेळ लागला फिरायला.’ मी अभिमानानं सांगितलं, “एक तास फिरत होतो. त्यानंतर दहा मिनिटं विश्रांती घेऊन आलो.’ बायकोनं काही न बोलता आश्‍चर्यचकित चेहरा केला. दुसऱ्या दिवशी तीच परिस्थिती. अर्धातासच फिरलो. एका बाकावर बसून तासभर निरीक्षण केलं; पण पदरी निराशाच पडली. असं आठवडाभर चाललं; पण जे काही ठरवलं ते काही जमेना. लक्षात आलं जे तरुणपणी जमलं नाही ते आता कसं जमेल; पण त्या निमित्तानं 8-10 दिवस न चुकता फिरणं झालं.

मी अगदी रेग्युलर फिरायला जात होतो. त्यावर बायको काहीच प्रतिक्रिया देत नव्हती. मला वाटत होतं. माझा संकल्प पुरा होतोय. तिचा अंदाज चुकणार हे तिला खटकत असावं. पण तिच्या चेहऱ्यावर काहीच भाव दिसायचे नाहीत. तिचा चेहरा निर्विकार असे. मी कितीही उशीर केला तरी तिनं उशीर का म्हणून पण कधीही विचारलं नाही. आठवडाभरानंतर माझा उत्साह कमी होऊ लागला.
आठवडाभर माझ्या अंगात जो उत्साह संचारला होता त्याला ती अनुवादित कथा कारणीभूत होती.

ती साधारणत: अशी होती-
माझ्यासारखा एक माणूस रिटायर झाल्यावर ठरवतो. सकाळी रोज फिरून आपले वजन कमी करायचे. त्याची बायको त्याला ठराविक वेळ देते आणि तो त्या ठराविक वेळेत येतो की नाही, तेही काटेकोरपणे बघत असते. एका आठवड्यातच त्याचा उत्साह वाढतो. थोड्या अवधीतच त्याचं वजनही जाणवण्याइतकं कमी होऊ लागतं. पोट कमी होतं. त्याची बायको खूश होते.

आणि एक दिवस त्याला म्हणते, “आता नको फिरायला जाऊ, ठरवलं होत तितका तू बारीक झालायस.’
तो जरा नाराजीनंच बरं म्हणतो आणि परत जोशात येऊन बेसुमार खायला सुरुवात करतो. लठ्ठपणा वाढण्यासाठी तो गोडपदार्थ जास्त खातो. 15 दिवसांत त्याची तब्येत परत सुधारते. पोट वाढू लागतं. मग तो परत फिरायला जाऊ लागला आणि थोड्याच दिवसांत त्याचं वजन कमी झालं. वजन कमी झाल्यावर फिरणं बंद. मग खाणं चालू. वजन वाढल्यावर फिरणं चालू, असं तीन-चार वेळा झाल्यावर तो एके दिवशी हार्टफेलनं मरतो. त्या दिवशी त्याचं वजन कमी होण्याचं गुपित कळतं.

त्याच्या फोटोसमोर उदबत्त्या लावण्यासाठी एक तरुणी येते आणि धाय मोकलून रडायला लागते. त्याला बागेत ती तरुण मैत्रीण भेटलेली असते आणि दोघांचं सूत जमलेलं असतं. तिच्याबरोबर वेळ काढून ठरलेल्या वेळेत घरी येण्यासाठी म्हणून तो भरधाव वेगानं पळत येत असतो. त्याची बायको फार कडक असते म्हणून त्याला फिरण्यासाठी दिलेली वेळ त्याला पाळावी लागते.

मी विचार केला, आपल्यालाही असं कोणीतरी भेटलं तर? निदान प्रयत्न करायला काय हरकत आहे? अगदी सुत जरी जमलं नाही तरी एक चांगली मैत्रीण जरी भेटली तरी समाधान मानता येईल. असा विचार करून मी रोज फिरायला जाण्याचे ठरवलं होतंच त्याला आता बळ मिळालं. रोज फिरायला जाऊ लागलो; पण यश काही मिळालं नाही. निदान असं वाटत होतं की घरी आल्यावर बायकोला संशय तरी येईल; पण तिनं कितीही उशीर केला तरी एकदाही विचारलं नाही की उशीर का म्हणून?

मीच स्वत: एकदा तिला विचारलं तर ती म्हणाली, “अहो, मी तुम्हाला चांगली ओळखते. तुम्ही दहा एक मिनिटं फिरून एका बाकावर बसून येत असणार किंवा कोणी भेटलंच तर गप्पा मारत असाल.’ थोड्या वेळात हसून म्हणाली, “मला पक्‍की खात्री होती की तुमचा हा संकल्प 3-4 दिवसांपेक्षा जास्त टिकणार नाही.’

पण मी एक आठवड्यापेक्षाही एक-दोन दिवस जास्तच फिरलो. तुझा अंदाज चुकला. ती जरा गूढ हसत म्हणाली, “हो, थोडा चुकला खरा! पण तुमच्या रोज फिरायला जाण्याचं गुपितही मला माहीत आहे.’
मी चमकलो, तिला कसं कळले असेल? छे, शक्‍यच नाही, म्हणून थोड्या आत्मविश्‍वासाने म्हटलं, सांग बघू.
त्यावर ती एवढंच म्हणाली, “मी पण ती कथा वाचली आहे.’

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.