#प्रभात_दीपोत्सव_२०२० : प्राजक्त

– मनीषा लबडे-दहातोंडे


सायंकाळ झाली. मोठ्या भक्‍तीभावाने नीताने सांजवात देवासमोर लावली. नित्याप्रमाणे शिवलिलामृताचे पठण सुरू केले. तेवढ्यात मोबाइल खणखणला. व्यत्यय नको म्हणून नीताने वाचन सुरूच ठेवले. शांतपणे देवदर्शन घेतलं. एव्हाना मोबाइल वाजून वाजून बंदही झालेला होता. ती देवघरातून बाहेर आली आणि पुन्हा रिंग वाजली. फोन सुधीरचा, तिच्या नवऱ्याचा होता. तिने फोन घेतला, “”हॅलो, नीतू किती वेळचा फोन करतोय! काय करत होतीस? बरं जाऊ दे. आता तुझं तत्त्वज्ञान नाही ऐकायचं मला! मी आणि माझे मित्र दोन दिवसांसाठी गावी चाललो, वाट पाहू नकोस, हे सांगण्यासाठी फोन केला होता. आता फोन ठेव, चल बाय!” 

“बाय’ नीतूने म्हणालेला “बाय’ शब्द त्याच्या कानावर कदाचित पडलाही नसेल तेवढ्यात त्याने फोन ठेवूनही दिला. सुधीरचं असं वागणं नेहमीचं होतं. आज लग्नाला सात-आठ महिने झाले पण सुधीर काही सुधारत नव्हता. अवेळी येणे, ड्रिंक्‍स घेणे, सिगारेट ओढणे सगळ्या वाईट सवयी हटता हटत नव्हत्या.
एकदा धाडस करून नीता तिच्या सासऱ्यांना म्हणाली. “पण तो काय वायफट फिरतो का?’ असं उत्तर कानी आल्यावर तिने सांगायचे सोडून दिले.

तेवढ्यात सासूबाई म्हणाल्या, “”नीता मी माझ्या मैत्रिणीकडे चालले. स्वयंपाकात तुला जे वाटतं ते कर. मी आलेच.” असं म्हणून त्या घराबाहेर पडल्या. ही एकटीच! नव्या घरातील प्रत्येकाचं वागणं तिला एका पाठोपाठ धक्‍के देत होतं. ते पचवत ती चालत होती. त्या शिवाय तिला पर्याय नव्हता. परिस्थितीशी जुळवून घेण्याशिवाय तिला मार्गच नव्हता.

नीता एक साधारण घरातील मुलगी, लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हिरावल्यामुळे आजीने म्हणजे आईच्या आईने मोठं केलं. आजीच्या संस्कारमय वातावरणात वाढलेली नीता सासरी आल्यापासून कोमेजून गेली होती. “सातच्या आत घरात’ अशा वातावरणात वाढलेली नीता या स्वतंत्र, बंधमुक्‍त घरात अवघडल्यासारखं राहत होती. सोसाट्याच्या वाऱ्यात श्‍वास घेणं अवघड जातं, तशी तिची या मोकळ्या वातावरणात घुसमट होत होती.

नोकरी-घर यात तिची कसरत होत होती. घरात कोणालाच नियम नव्हते. शिस्त नव्हती, कोणी कधी यायंच, कधी जेवायचं, एकत्र बसून जेवणे हे तर अजिबात नसायचं. प्रत्येकाला वाढून देणे एवढं मात्र नीताला न चुकता करावं लागायचं. रात्री झोपायला नेहमी उशीर व्हायचा. सकाळी जॉबमुळे लवकर उठायचं, आवरायचं आणि निघायचं. बस्स! एवढेच तिचं जीवन झालं होतं. सुधीर, सासू-सासऱ्यांनी तिच्यासोबत कधीच गप्पा मारल्या नाहीत. ती नवीन घरात आली. तिच्या भावना समजून घ्याव्यात, असं कोणालाही वाटलं नाही.

दोन दिवसांनी सुधीर घरी आला. डोळे एकदम लालबुंद. जणू रक्‍तच उतरलयं. बॅग लांबूनच फेकून दिली आणि तसाच बेडवर आडवा झाला. नीता त्याच्याजवळ येऊन बसली.
“”कोणत्या गावी गेला होता?”, असा प्रश्‍न तिने विचारल्यावर सुधीर जोरात ओरडला, “”हे विचारणारी तू कोण? माझ्या आईने मला कधीच हा प्रश्‍न विचारला नाही. तुही विचारायचा नाही,” असं म्हणून त्यानं तिला जोरात ढकललं.

ती बेडवरून खाली पडली. नीताला रडू आलं. ती रूमबाहेर आली. घरात कोणीही नव्हतं. कोणाजवळ तरी भरून आलेले मन मोकळं करावं, असं तिला वाटतं होतं. पण कोणीही नव्हतं. मोठ्या घरातील लोकांची मन छोटी असतात, हे ती अनुभवत होती.

इच्छा नसतानाही नीताच्या घुसमटलेल्या मनाने आजीकडे धाव घेतली. आजीला पाहताच तिला भरून आलं. सगळी चिडचिड, सगळी मनातील मळभ आजीजवळ मोकळी केली. आजीही शांतपणे ऐकत होती. नीताची होत असलेली घुसमट तिला कळत होती. पण आता नवीन घरातील वातावरणात तिला नकोसं झालं होतं. हेही जाणवत होतं. नीताला शांत होऊ द्यावं, मग समजून सांगू, असं आजीला वाटलं. नीता आजीच्या मांडीवर डोकं ठेवून तशीच झोपी गेली.

आजी हळूच उठली. तिच्या सासूबाईंना फोन लावून कळवलं की, “नीता इकडे आली आहे, उद्या येईल.’ स्वयंपाक झाल्यावर आजीनं नीताला उठवलं. दोघींनी जेवण केले. जेवण झाल्यावर दोघी अंगणात बसल्या.
नीता आजीला म्हणाली, “”आजी, बघा ना दुपारपासून मी इकडे आले. सुधीरचा फोन तरी आला का? खूप केअरलेस आहे.”

“”अगं मी तुझ्या सासूबाईंना कळवलं, तू इकडे आली. त्यांनी दिला असेल निरोप” आजीनं असं म्हटल्यावर नीताने विषयच बदलला. आजीनेही मग त्या विषयावर न बोलायचं ठरवलं. अंगणातला प्राजक्‍त चांगलाच मोहरला होता. सगळीकडे सुगंध दरवळत होता. नीता एकटक झाडाकडे पाहत होती. आजी नीताकडे पाहून म्हणाली, “”नीता आपणही “प्राजक्‍त’ झालं पाहिजे.”

प्रश्‍नांकित नजरेने नीता आजीकडे पाहू लागली. ती आजीला काही विचारणार तोच आजी म्हणाली, “”चल, उद्या लवकर उठायचं. तुला आहे सुट्टी, मला नाही ना.” असं म्हणून दोघीही हसल्या आणि आत गेल्या.
दुसऱ्या दिवशी नीता उशिरा उठली. आजीची पूजा उरकली होती. सकाळच्या प्रसन्न वातावरणात नीताचा मूडही प्रसन्न झाला. बाहेर अंगणात गेली. प्राजक्‍ताचा सडा पडलेला पाहून रात्रीचं आजीचं वाक्‍य आठवलं. तिने आजीला बोलावले, “”आजी, काल तू असं का म्हणाली, आपणही प्राजक्‍त व्हावं?”

आजी हसली, नीताला म्हणाली, “”त्या प्राजक्‍ताच्या झाडाला अलगद हलवं बरं.” नीताने हलवलं, तिच्या अंगावर फुले पडली. आजी म्हणाली, “”आता जोरजोरात हलवं.” नीताने जोरजोरात हलवंलं. तिच्या अंगावर प्राजक्‍ताचा सडाच पडला. सगळीकडे फुलंच फुलं झाली. फुलांच्या वर्षावाने नीता सुखावली.
तिच्या निरागस चेहऱ्याकडे पाहत आजी म्हणाली, “”नीता आपणही या प्राजक्‍ताप्रमाणे असावं, कितीही त्रास झाला तरी सुमनांचा वर्षाव करणारं, आनंद देणारं… समोरच्यानं राग भरलं की, शांतपणे प्रतिसाद देणारं… तरंच जीवन आनंददायी बनतं. अगं, मनात स्नेहाचे दिवे उजळवले की, घरात प्रकाश पडणारच, घर तेजाने उजळणारचं फक्‍त वेळ लागतो. पण संधी तर प्रत्येकाला मिळाली पाहिजे ना!

राहिला प्रश्‍न सुधीरचा.. त्याच्या सवयीचा.. त्याही बदलतील. मातीत रूजलेल्या रोपाला उपटून दुसरीकडे लावल्यास रुजायला वेळ लागणारच. त्यालाही दे तसा..! तुला मात्र सहन करावं लागेल. अगदी प्राजक्‍त होऊन…” 

आजीच्या बोलण्याचा अर्थ दिला उमगला. मनोमन सुधीरला माफही केलं. अन्‌ घरात जाऊन आवरू लागली. आजीनेही कामाला सुरुवात केली. तेवढ्यात दाराची घंटी वाजली. नीताने दार उघडलं. समोर सुधीरला उभा पाहून ती अवाक्‌ झाली. सुट्टीत बाराशिवाय न उठणारा सुधीर चक्‍क नऊ वाजता आवरून सावरून आपल्याकडे आलेला पाहून तिला आजीचं वाक्‍य आठवलं, त्याही बदलतील हळूहळू… रुजायला वेळ लागणारंच… फक्‍त संधी मिळाली पाहिजे.

दोघे एकमेकांकडे पाहतच उभे राहिलेले पाहून आजी म्हणाली, “”अगं नीता त्याला आत येऊ दे की…” आजीच्या आवाजाने दोघे भानावर आले. चहा-पाणी-नाष्टा उरकला. आजीने जावयाबरोबर गप्पा मारल्या. सुधीरचं एक नव रूप नीताला दिसत होतं. हा तोच आपल्याला ढकलणारा सुधीर आहे, हा प्रश्‍न तिला पडत होता.

तेवढ्यात सुधीर म्हणाला, “”चला आजी, येतो आम्ही. नीता चल बरं पटकन. आवर…” नीता आवरून आली. आजीचं दर्शन घेतलं. आजीनं तिच्या हातात प्राजक्‍ताचं छोटसं रोप ठेवलं. निर्विकारपणे आजीकडे नीता पाहतच राहिली. नजरेने जणू सांगत होती, “आजी मी होईन प्राजक्‍त… तुझ्या अंगणातल्या बहरलेल्या प्राजक्‍तासारंख.’

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.