#प्रभात_दीपोत्सव_२०२० : पाहुणा

– मेघश्री दळवी


गोष्ट तशी फार फार वर्षांपूर्वीची नाहीय, म्हटलं तर अलीकडचीच आहे; पण ऐकल्यावर तुम्हाला कदाचित कोणे एके काळी घडलेली परिकथा वाटेल. तशी ती नाहीय- विश्‍वास ठेवा माझ्यावर. 

त्याची निवड झाली ती पण मोठ्या गमतीशीर कारणाने. तो वर्णन फार छान करायचा म्हणून. एखाद्या व्यक्‍तीचं, दृश्‍याचं किंवा घटनेचं तो इतकं हुबेहूब वर्णन करायचा की ते सगळं डोळ्यासमोर प्रत्यक्ष उभं राहायचं. जिवंत होऊन. त्याची निरिक्षण शक्‍ती जितकी विलक्षण होती तितकी त्याची शब्दसंपदाही अफाट होती. या दोन गुणांचा असा अपूर्व मिलाफ त्याच्यात झाला होता की त्याच्या वर्णनकथनाच्या मैफिली अफलातून रंगायच्या.

तो त्यासाठी तशी मेहनतही करायचा. जागोजागी फिरायचा. कधी हिमाच्छादित पहाडांवर, तर कधी वैराण वाळवंटात. कधी घनदाट अरण्यात तर कधी समुद्रकिनाऱ्यावर. त्यासाठी इतिहासाचा, भूगोलाचा,स्थानिक रीतीरिवाजांचा, खाद्यसंस्कृतीचा त्याने खूप कसून अभ्यास केला होता. वेगवेगळ्या भाषा शिकून घेतल्या होत्या. वेगवेगळ्या संस्कृतींची माहिती करून घेतली होती.

जे जे काही तो पाहायचा ते ते मनात नोंदवून ठेवायचा आणि अधूनमधून कागदावरही उतरवून ठेवायचा. मग गावोगावी आमंत्रणं आली की तो तिथे जाऊन अनुभव कथन करायचा. शब्दातून अख्खा देखावा उभा करायचा. त्याच्या या दैवजात गुणाला खरोखरीच काही तोड नव्हती. त्यामुळे या अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी त्याचा विचार होणं काही नवलाचं नव्हतं. त्यातून त्याचं तरुण वय, उत्साह, तंदुरुस्त शरीर. किंबहुना या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी दुसऱ्या कुणाचा नावाचा विचार करायचीही वेळ आली नव्हती.

शास्त्रज्ञांच्या समितीने त्याला बोलावून या खास निवडीची बातमी दिली तेव्हा त्याचा आनंद गगनात मावेना. मुळात हा प्रकल्प खूप गुप्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे ते सगळे तपशील ऐकूनच तो आधी भारावून गेला होता. त्यातून ते सर्वात महत्त्वाचं काम आपण करायचं आहे म्हटल्यावर तर तो अधिकच आनंदून गेला होता.

तिकडे शास्त्रज्ञांचा गट मोठ्या जोमाने कामाला लागला होता. काल आणि अवकाशावरचे प्रयोग म्हणजे भल्याभल्यांची कसोटी लागते. इथे तर अवाढव्य अवकाशातला एक मोठा पल्ला पार करून जायचं होतं. तेही अवघ्या काही सेकंदात.

तुम्ही म्हणाल हे कसं शक्‍य आहे? आपल्या अवकाश यानांचा वेग पाहता दुसऱ्या ग्रहावर जायलाच किती महिने लागतात. मग दुसऱ्या ग्रहमालेत जायला किती वर्षे लागतील? आणि त्याही पलिकडे जायला? पिढ्यान्‌पिढ्यांचा प्रवास होईल इतकं हे अंतर कापताना. मग हे काही सेकंदात कसं करायचं?
तर त्यालाही उत्तर आहे- शास्त्रज्ञांनी तेव्हा अवकाशात एक विवर शोधून काढलं होतं. हे विवर अवकाशातल्या दोन दूरवरच्या बिंदूंना जोडून त्यांच्यामधलं भलं मोठं अंतर क्षणार्धात पार करू शकत होतं. या विवरातून प्रवास केला तर कोट्यवधी मैलांचं अंतर अक्षरशः मिलिमीटर इतकं कमी होत होतं.

मी काय म्हणतोय ते समजायला कठीण जात असेल ना? मलाही कठीण वाटतंय- जवळजवळ अशक्‍य वाटतंय. पण ते शास्त्रज्ञ मात्र आपल्या विश्‍वासावर ठाम होते. म्हणूनच त्यांनी आपल्या प्रयत्नांची बाजी लावून या विवरातून अंतराळ प्रवास करण्याची भव्य योजना तयार केली होती. आणि या प्रवासासाठी त्यांना हवा होता- हो, तोच, आपल्या अनुभवकथनांनी लोकांना वेड लावणारा, सगळे अनुभव बारकाईने टिपून घेणारा, सगळ्यांचा लाडका!

प्रवासाची तयारी एकदम जय्यत झाली होती. ज्या नव्या ग्रहावर तो उतरणार होता त्याची काहीच माहिती त्याला नव्हती. इतकंच काय तर शास्त्रज्ञांच्या त्या गटालाही या नव्या ग्रहाविषयी फारसं काही सांगता येत नव्हतं. म्हणूनच ही संधी त्याच्या दष्टीने महत्त्वाची होती. तिथली माहिती गोळा करायची, नोंदून ठेवायची, आणि मग परत जाऊन सर्वांना कथन करायची.

असं अनोखं काम तो पहिल्यांदाच करत होता. केवढं आव्हान होतं- केवढा थरार होता. ठरल्याप्रमाणे तो त्या नव्या ग्रहावर उतरला. नेहमीसारखं त्याने आपलं काम सुरू केलं. प्रवास आणि टिपणं. नवनव्या ठिकाणी जाऊन त्याच्या ग्रहवासीयांसारखी दिसणारी माणसं पाहायची. त्यांची रेखाटनं करायची. थोडीशी विचित्र दिसणारी पण सुखकर वाटणारी वाहनं वापरायची. ते वेगळे अनुभव लिहून ठेवायचे.

कधी मऊमऊ हिरव्यागार गवतावरून चालताना, कधी लाल दगडी इमारतींवरून सोनेरी सूर्यकिरणं उतरत असतानी, कधी निळ्याशार आभाळात ढगांची दाटी झाल्यावर त्याला आपल्या ग्रहाची आठवण यायची. मनातल्या मनात तुलना सुरू व्हायची. त्याचा ग्रह आणि हा नवा ग्रह पृथ्वी. पृथ्वी आणि त्याचा ग्रह. पृथ्वीवर तो नवनव्या भाषा शिकला. नवे शब्द, नव्या कल्पना शिकला. तिथल्या माणसांचे रीतीरिवाज शिकला. त्यांच्या इतिहासात रमला. त्यांच्या वर्तमानात रुळला. आधी ठरल्याप्रमाणे त्याने जवळचं एक विद्यापीठ गाठलं होतं आणि तिथल्या एकाला विश्‍वासात घेतलं होतं. मग या नव्या मित्राच्या मदतीने तो पृथ्वी आणि तिथल्या माणसांना समजून घ्यायला लागला होता.

त्याने आपला इरादाही स्पष्ट केला होता- त्याला फक्‍त इथली जेवढी माहिती घेता येईल तेवढी घेऊन परत जायचं होतं. आपल्या ग्रहवासीयांना ती माहिती द्यायची होती. मग नंतर परत अशाच आणखी एखाद्या मोहिमेवर जाऊन दुसऱ्या अनोख्या ग्रहाची सफर करायची होती. आपल्या ग्रहावर फिरताना जो अनोखा आनंद अनुभवायला मिळायचा, त्याहूनही अधिक आनंद त्याला या नव्या ग्रहावर मिळाला होता आणि तेच आता पुन्हा पुन्हा करायच्या इच्छेने तो पार झपाटून गेला होता.

त्याच्या ग्रहावरच्या शास्त्रज्ञांनी त्याला दिले होते तीन महिने. पृथ्वीवरच्या कालमापनातली. तीन महिने पृथ्वीवर फिरून झाल्यावर ते त्याला त्या विवरातून परत आपल्या ग्रहावर घेऊन जाणार होते. या पृथ्वीवरच्या वास्तव्यात त्याने कल्पनेपलीकडचे अनुभव घेतले होते. इथल्या पद्धती बारकाईने पाहिल्या होत्या. आपल्या किंचित वेगळेपणाला इथले सजीव कसे प्रतिसाद देतात, हे अनुभव तर अभूतपूर्व होते. आता हे सगळं तिथे जाऊन सांगायला तो खूप उतावीळ झाला होता.

तिसरा महिना संपत आला तेव्हा त्याने परतीची तयारी सुरू केली. आपल्या टिपणांच्या, रेखाटनांच्या प्रती आपल्या या नव्या मित्राकडे देऊन ठेवल्या. तो आपल्या ग्रहावर परत गेल्यावर त्याचा मित्र या नोंदी पृथ्वीवर प्रसिद्ध करणार होता. त्याने सगळी आवराआवर केली. सफाईदारपणे केलेली टिपणं, रेखाटनं, वेगवेगळ्या भाषांमधल्या नोंदी. काही मजेदार घडामोडी. रंग भरलेली चित्रं- सगळं गोळा करून तो तयार झाला.
आणि तो वाट बघत बसला.

तीन महिने झाले. आणखी एक दिवस उलटून गेला. मग दोन दिवस. आणि पुढचा महिना. आपल्या ग्रहावर काहीतरी गडबड झाली असावी याचा त्याला अंदाज आला. कालगणनेत एखादी चूक असावी किंवा आपल्या त्या काल-अवकाश यंत्रात बिघाड झाला असावा. नाहीतर इतक्‍या प्रचंड अंतराच्या मोजमापात कुठेतरी फरक पडून कदाचित यंत्र दुसऱ्याच ग्रहाकडे वळलं असेल तर? किंवा ते विवर- तेच बंद झालं असेल तर? त्या विचाराने तो अंतर्बाह्य चरकला.

त्याने मग आणखी सहा महिने वाट बघितली. आता त्याच्या मनात अनेक शंका उभ्या राहत होत्या- यंत्र बंदच पडलं असेल तर? या यंत्राच्या प्रचंड ऊर्जावापरावर काही शास्त्रज्ञांचा आक्षेप होता. त्यांचं म्हणणं खरं झालं असेल तर? यंत्र इतकी ऊर्जा गिळत राहिलं तर ते अख्खा ग्रहच स्वाहा करेल, असा त्यांचा तर्क होता. तो खरा झाला असेल तर? मग आपला ग्रह उरलाच नसेल तर? तर आपण कुठे जाणार? कधी कसे जाणार?
पण या जर-तर ला तसा काही अर्थ उरला नव्हता. परत जायचा मार्ग बंद झाला होता हेच एक आता सत्य होतं. आणि त्या सत्याला आता धैर्याने सामोरं जायचं होतं. तेवढं एकच आता त्याच्या हातात होतं.

एकदा परत जायचं नाही हे निश्‍चित झाल्यावर त्याने पृथ्वीवासीयांना सगळं काही सांगून टाकायचं ठरवलं. जेवढं काही त्या अवकाश विवराबद्दल ठाऊक होतं, जेवढं काही त्या काल-अवकाश यंत्राबाबत माहीत होतं ते सगळं. त्याच्या ग्रहावरचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प, त्यासाठीची तयारी, शास्त्रज्ञांनी अनेक कसोट्यांवर तपासून पाहिलेली मोहीम, मग प्रत्यक्ष प्रवास- जे जे काही शक्‍य होतं ते सगळं.

पृथ्वीवासीयांना सारं काही समजावून, पटवून द्यायचं तर त्यांना रुचेल अशा भाषेतच सांगायला हवं होतं. आपल्या ग्रहावर तो ज्या आत्मविश्‍वासाने, ज्या तडफेने अस्खलितपणे बोलायचा, तसं तर इथे शक्‍य नव्हतं. इथली भाषा वेगळी, बोलण्याची तऱ्हा वेगळी, संस्कृती वेगळी. म्हणून मग त्याने आपली संपूर्ण कहाणी लिहून काढायची तयारी केली. लिहायची त्याला तशी सवय नव्हती. फारफार तर तो नोंदी काढायचा. त्यातून ही नवी भाषा अजून पूर्णपणे जमत नव्हती. तरीही होईल तसं त्याने लिहायला घेतलं. आणि सुरुवात केली- आपल्या स्वतःच्याच कहाणीने.

हो तुम्ही ऐकताय ती गोष्ट त्याची, म्हणजे माझीच आहे. माझं माझ्या ग्रहावरचं नाव तुम्हाला उच्चारायला अवघड वाटेल म्हणून सांगत नाही. आमच्या ग्रहावर माणसाला नाव खूप उशिरा देतात. त्याच्यातल्या कलागुणांची पारख करून. एखाद्याला नाव असतं टोपली-कलाकार. त्याच्या टोपली विणण्याच्या कसबाला दिलेली ती दाद असते. तर एखादीचं नाव असतं तण-निपुण. तण ओळखून उपटून काढण्यात ती तज्ज्ञ असते, हा त्यामागचा संदर्भ. तसा माझ्या नावाचा अर्थ होता प्रवासी-कथनकार.

तुमच्या भाषेत मला तशाच अर्थाचं नाव मिळालं नाहीय. तुमच्यातलं एखादं नाव घेईन, तर मला त्यांचे अर्थ अजून तसे उलगडलेच नाहीत. म्हणून थोडंफार अर्थपूर्ण असं मला मी नाव घेतलंय- पाहुणा. होय. मी परग्रहावरून तुमच्या ग्रहावर आलेला पाहुणा आहे. पाहुण्याला तुम्ही आमंत्रण दिलेलं नाहीय.

तसा तो आगंतुकपणेच आला आहे. पण आता त्याला आपल्यातला मानून घ्या. माझ्या ग्रहाबद्दल, तिथल्या माणसांबद्दल तुमची उत्सुकता चाळवली असेल ना? सांगण्यासारखं खूप खूप आहे माझ्याजवळ. पण आज इथेच थांबतो. तुमच्या भाषेवर चांगलं प्रभुत्व आलं ना, की मग माझा गोष्टींचा सारा खजिनाच उघडून दाखवीन तुम्हाला. तेच तर माझं कसब आहे. पण ते नंतर. आता आधी मला इथल्या असंख्य गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. तुमच्या पृथ्वीवरच्या म्हणजे आता जी माझीही झाली आहे, त्या पृथ्वीवरच्या गोष्टी!

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.