नवी दिल्ली – पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगडचे प्रशासक बनवारीलाल पुरोहित यांनी राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठवलेल्या राजीनामा पत्रात त्यांनी पद सोडण्यामागे वैयक्तिक कारण असल्याचे सांगितले आहे. बनवारीलाल पुरोहित यांनी ऑगस्ट २०२१ मध्ये पंजाबचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारला होता.
पंजाबमधील त्यांचा कार्यकाळ अनेक वादांनी घेरला होता. विशेषत: आम आदमी पक्षाचे भगवंत मान यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या संबंधात कमालीचा तणाव निर्माण झाला होता. पंजाब विधानसभेचे अधिवेशन बोलावण्यावरून दोघांमधील वाद इतका वाढला की हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले.
विविध प्रश्नांवर ते अनेकदा सरकारकडे जाब विचारत राहिले.ऑक्टोबरमध्ये त्यांनी पंजाब विधानसभेच्या दोन दिवसीय अधिवेशनात मांडण्यात येणारी तीन विधेयके मंजूर करण्यास नकार दिला होता. यानंतर मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह आम आदमी पक्षाने त्यांना विरोध केला.
भगवंत मान यांनी शुक्रवारीच राज्यपालांवर निशाणा साधला होता. पंजाबमधील राज्यपाल आपल्याला त्रास देत असल्याचे मान दिल्लीत म्हणाले होते. पुरोहित हे २०१७ ते २०२१ पर्यंत तामिळनाडूचे राज्यपाल होते. त्यापूर्वी ते २०१६ ते २०१७ पर्यंत आसामचे राज्यपाल होते. पुरोहित हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. ते तीन वेळा नागपूरचे खासदार झाले आहेत. पुरोहित यांचा जन्म १६ एप्रिल १९४० रोजी राजस्थानमध्ये झाला.