वाघोली (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे यांच्या माध्यमातून मराठा समाजाचा एक अपक्ष उमेदवार दिला जाणार असल्याने त्याच अनुषंगाने वाघोलीतील सकल मराठा समाज बांधवांची बैठक वाघेश्वर मंदिर येथे बुधवारी (दि. 27) सायंकाळी पार पडली. बैठकीमध्ये वाघोलीतून मराठा समाजाचे इच्छुक उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब करून त्यांचा अहवाल मनोज जरांगे पाटील यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे.
मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवारांचे नाव जाहीर करण्यासाठी मराठा समाजाला गावागावात बैठका घेऊन अहवाल पाठविण्याचे आवाहन केले होते. शिरूर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वाघोली येथील सकल मराठा समाज बांधवांची बैठक संपन्न झाली.
यामध्ये इच्छुक उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यांचा अहवाल मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. शिरूर लोकसभेतील इतर गावे तसेच तालुक्यांमधून देखील मराठा समाजाच्या इच्छुक उमेदवारांचे अहवाल मनोज जरांगे पाटील यांच्याकडे पाठविण्यात येणार आहेत. जरांगे पाटील शिरूर लोकसभेसाठी जो उमेदवार जाहीर करतील त्या उमेदवाराचे काम करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.