नगर (प्रतिनिधी) – म्युचल फंडात गुंतवणुक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून मजुरी काम करणार्या महिलेची २ लाख ८० हजाराची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात दोघांविरोधात बुधवारी (दि. २७) सायंकाळी फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पुनम महेश गायकवाड (वय ३४ रा. भाजी मार्केटजवळ, अंबिका हायस्कूल पाठीमागे, केडगाव, हल्ली रा. बालिकाश्रम रस्ता, नगर) यांनी फिर्याद दिली आहे.
गणेश कराळे (पूर्ण नाव माहिती नाही, नोकरी टाटा एआयजी ऑफिस, झोपडी कँन्टींग), सोमनाथ रावसाहेब कर्डिले (नोकरी पंजाब नॅशनल बँक, सावेडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सदरची घटना २० मे २०२३ ते ७ डिसेंबर २०२३ दरम्यान फिर्यादीच्या राहत्या घरी, केडगाव येथे घडली आहे.
कराळे व कर्डिले हे दोघे वेळोवेळी फिर्यादी यांच्या केडगाव येथील घरी गेले व म्युचअल फंडात पैसे गुंतवणुक करून मुद्दलासह चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविले. फिर्यादीने त्यांच्यावर विश्वास ठेऊन वेळोवेळी फोन पे व इतर माध्यमातून २ लाख ८० हजाराची रक्कम सुपूर्द केली.
दरम्यान फिर्यादी यांनी म्युचअल फंडाकरीता दिलेली रक्कम मुद्दलासह परतावा मागितला असता सोमनाथ कर्डिले याने उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचा ५ नोव्हेंबर २०२३ रोजीचा ७० हजाराचा धनादेश देऊन सदर बँकेचे पेमेंट व्यवहार स्टॉप करून फिर्यादीची दिशाभूल केली. दरम्यान यासंदर्भात फिर्यादी यांनी न्यायालयात दावा दाखल केला होता. न्यायालयाच्या आदेशानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार गणेश धोत्रे अधिक तपास करत आहेत.