महापालिका प्रशासनाच्या चिंतेत भर
249 “पॉझिटिव्ह’ रुग्णांपैकी केवळ दहा रुग्णांमध्ये करोनाची लक्षणे
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात बुधवारपर्यंत करोनाचे 447 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. आजमितीला शहरातील 249 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी तब्बल 236 रुग्णांमध्ये करोनाची लक्षणे नाहीत. तर, केवळ दहा रुग्णांमध्ये करोनाची लक्षणे असून सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यातील काही जणांवर वायसीएम तर काही जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरात करोनाचा कहर सुरू आहे. शहराच्या नवीन भागात दररोज करोनाचे रुग्ण सापडत आहेत. जवळपास शहराच्या सर्वच भागात करोनाचे रुग्ण आढळले आहेत. चार ते पाच दिवसांपासून दिवसाला 40 च्या पुढे नवीन रुग्णांची नोंद होत आहे. आजपर्यंत शहरातील 447 जणांना करोनाची लागण झाली आहे.
दीड महिन्याच्या बाळांपासून सर्वच वयोगटातील नागरिकांना करोनाची बाधा होत आहे. त्यात सर्वाधिक युवकांना लागण झाली. त्यामध्ये एक समाधानाची बाब म्हणजे रुग्णांचे करोनामुक्त होण्याचे प्रमाणही चांगले आहे. आजपर्यंत 191 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. याशिवाय बोटावर मोजण्याइतक्या रुग्णांमध्येच करोनाची लक्षणे आढळून येत आहेत. मृत्यूचे प्रमाणही कमी आहे. शहरातील सात जणांचा आजपर्यंत करोनामुळे मृत्यू झाला आहे.
शहरातील 249 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या रुग्णांना महापालिका रुग्णालय, बालेवाडीतील करोना केअर सेंटरमध्ये देखरेखीखाली ठेवण्यात येत आहे. दहा पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये करोनाची लक्षणे आहेत. तर, करोनाबाधित सहा रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर महापालिकेच्या आणि खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.