केडगाव – दौंड तालुक्यातील आलेगाव आणि पानवली येथील दोन महिलांचा करोनाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
दौंड तालुका अजुनपर्यंत तरी करोनाबाधीत यादीत नाही परंतु मागील चार दिवसांपूर्वी आलेगाव येथील एका महिलेला सर्दी खोकल्याचा त्रास सुरू झाला तातडीने त्यांना ससून रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आणि राहु बेटातील पानवली गावातील महिला शिक्रापूर (ता. शिरूर) येथील खासगी डॉक्टरांकडे उपचारासाठी गेली होती.
उपचार करणाऱ्या डॉक्टरांना या विषाणूचा प्रादुर्भाव झाला असल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या पानवली येथील महिलेलाही तात्काळ पुणे येथील ससून रुग्णालयात पाठवण्यात आले.
परंतु या दोन्ही महिलांचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक रासगे यांनी सांगितले. दौंड तालुक्यात अजुनपर्यंत एकही रुग्ण नसल्याचे तात्पुरते समाधान दौंडकरांच्या चेहऱ्यावर दिसत असले तरी करोना विषाणूची भीती मात्र कायम आहे.