कोपर्डे हवेली -देशभरात करोनचा फैलाव रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय बंद आहेत. ग्रामीण व शहरी भागातील केशकर्तनालय पूर्णपणे बंद असल्याने हा व्यावसायिक अडचणी आला आहेच शिवाय सर्वसामान्य जनतेचीही अडचण होऊन बसली आहे. यावर मार्ग म्हणून तरूणाईने एकमेकांचे टक्कल करण्याची शक्कल लढवली आहे.
लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार जरी थांबले असलेतरी निसर्ग थांबलेला नाही. रोजच्या रोज चकाचक दाढी करणारे असोत किंवा लहान मुले आणि फॅशनला भुलणारी तरूणाई असो, आपल्या आवडत्या सिनेकलाकारांप्रमाणे सोल्जर, वनसाईड, टू साईड, अशाप्रकारच्या केशभूषा करण्यात अग्रेसर असणाऱ्या युवावर्गाची कुचंबना झाल्याचे चित्र दिसत आहे. करोनाच्या पाश्वभूमीवर वाढलेले केस व दाढीचे करायचे काय? असा प्रश्न सर्वासमोर पडलेला आहे.
लॉकडाऊनमुळे कारागीरांचे साहित्य जमा करून घेतले आहे. त्यामुळे तरूणाईने पर्याय काढत दाढी करण्याचे खोरे हातात घेत घरच्या-घरी स्वतः अथवा एकमेकांचे केस कापण्यासाठी मित्रांची मदत घेऊन केस कापले जात आहेत. मात्र कुशल कारागीर नसल्याने केस कापताना चुका झाल्याने टक्कल करण्याशिवाय युवकासमोर मार्ग उरत नाही.
कधीकाळी टक्कल करणारी व्यक्ती समाजात टिंगल टवाळीचा विषय होती. परंतु, आता वैयक्तिक स्वच्छतेसाठी टक्कल करण्याचीच फॅशन झाल्याचे दिसत आहे. केसांचे कोरीव काम आता मागे पडले आहे. लहान मुलांच्या केश कर्तनाची जबाबदारी देखील महिलांनी स्वीकारली असल्याचे चित्र शहरी भागाबरोबर आता ग्रामीण भागात सर्रास दिसत आहे. त्यामुळे हा करोना आता कुणाकडून काय करून घेईल, याचा नियमच राहिलेला नाही.