नगर – उपनगरातील गुलमोहर रस्त्याला पर्यायी रस्ता म्हणून नव्याने करण्यात येत असलेल्या गंगा उद्यान ते औरंगाबाद रोड या नवीन रस्त्यावरील बंद असलेल्या पथदिव्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी नेहमी अंधारात बुडणारा हा रस्ता आता प्रकाशाने उजळून निघणार असल्याची माहिती माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर यांनी दिली.
नगरसेविका शोभाताई बोरकर यांच्या पाठपुराव्यामुळे आणि आ. जगताप यांच्या सूचनेनुसार महापालिकेच्या वतीने या रस्त्यावरील बंद पथदिव्यांच्या दुरुस्तीच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. या कामाची पाहणी माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर व सुमित कुलकर्णी यांनी केली. यावेळी माहिती देताना अजिंक्य बोरकर म्हणाले, नगर शहराचा विस्तार आता झपाट्याने होत आहे यासाठी शहरातील डीपी रस्त्याचा विस्तार व्हावा म्हणून आ. जगताप यांनी प्रयत्न सुरु केले आहे. याच धरतीवर गुलमोहर रस्त्याला पर्यायी रस्ता उपलब्ध व्हावा म्हणून गंगा उद्यानपासून नवीन रस्त्याची निर्मिती केली.