कॉंग्रेसने दिले मोदींना आव्हान
नवी दिल्ली : आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी केलेले एक वक्तव्य नागरिकत्व दुरूस्ती कायद्याला (का) विरोध दर्शवणारे असल्याचा दावा केला जात आहे. त्यावरून भाजपचे नेते असणाऱ्या सोनोवाल यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवून दाखवावे, असे आव्हान कॉंग्रेसने गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले.
का, राष्ट्रीय नागरिक नोंदणीपुस्तक (एनआरसी) या मुद्द्यांवरून सध्या देशातील वातावरण तापले आहे. का आणि एनआरसीला विरोध दर्शवण्यासाठी निदर्शनांचे सत्र सुरू आहे. विरोधकही त्याविरोधात आवाज उठवत आहेत. त्यावरून मोदींसह भाजप नेते विरोधकांवर टीकास्त्र सोडत आहेत. अशातच सोनोवाल यांनी केलेले एक ट्विट चर्चेचा विषय ठरले आहे.
आसामचा पुत्र या नात्याने मी कधीच राज्यात परदेशी नागरिकांना कायमस्वरूपी वास्तव्य करू देणार नाही, अशा आशयाची भूमिका त्यांनी मांडली. त्याचा आधार घेऊन कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी मोदींवर निशाणा साधला. मोदींनी आता देशाला मूर्ख बनवणे थांबवावे. तुमच्याच पक्षाचा मुख्यमंत्री का ला जाहीरपणे विरोध करत आहे. आता तुम्ही सोनोवाल यांनाही देशविरोधी ठरवणार का, असा सवाल सुर्जेवाला यांनी केला.