पिंपरी – जैन श्वेतांबर स्थानकवासी समाजाच्या संवत्सरी पर्वानिमित्त शहरातील जैन स्थानकांमध्ये आलोयणा वाचन, संवत्सरी प्रतिक्रमण, गुरू महाराजांचे प्रवचन आदी धार्मिक कार्यक्रम झाले. त्याशिवाय, जैन भाविकांनी उपवास, एकासना, आयंबिल आदी तपसाधना केल्या. करोना नियमांचे पालन करून हे कार्यक्रम घेण्यात आले.
आकुर्डी येथील जैन स्थानकात आकुर्डी-निगडी-प्राधिकरण जैन श्रावक संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सकाळी अंतगड सूत्रवाचन, महाप्रज्ञाशील साध्वी जागृतीजी म.सा. यांचे प्रवचन, सामुदायिक आलोयणा वाचन, संवत्सरी प्रतिक्रमण, क्षमापना आदी धार्मिक कार्यक्रम झाले. या प्रसंगी साध्वी वत्सलश्रीजी म.सा., जैन श्रावक संघाचे अध्यक्ष जवाहर मुथ्था, कार्याध्यक्ष सुभाष ललवाणी, संतोष कर्नावट, नेनसुख मांडोत, राजेंद्र छाजेड, राहुल पारख, राजेंद्र खिंवसरा, प्रकाश मुनोत, सचिन गांधी, मोतीलाल चोरडिया, रविंद्र बाफना, मोहन शिंगे, ज्योती खिंवसरा, चेतना मुथा, पायल मुथा, वंदना छाजेड आदी उपस्थित होते.
अन्य जैन भाविकांनी यूट्यूबच्या माध्यमातून घरबसल्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. पर्युषण पर्व काळात जैन भाविकांनी 10 आठ उपवास, 31 तीन उपवास, उपवास, आयंबिल आदी तप साधना केल्या. 108 तासाचा जाप, महावीर जन्मकल्याणक कार्यक्रम, विविध धार्मिक नाटिका, स्पर्धा आदींचे आयोजन केले आहे.
चिंचवड येथील धोका प्रतिष्ठानमध्ये श्री समरथ जैन श्रावक संघाच्या वतीने अंतगड सूत्रवाचन, साध्वी सुशयाजी म.सा. यांचे प्रवचन, आलोयणा वाचन, सूर्यास्त समयी प्रतिक्रमण आदी धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. साध्वी आरतीजी म.सा., मोक्षाजी म.सा., खुशबुजी म.सा. आदी उपस्थित होते.