मुंबई – भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत विचारावर चालणाऱ्या समविचारी नेत्यांनी कॉंग्रेसवर टीका करण्यापेक्षा कॉंग्रेसच्या झेंड्याखाली अथवा बरोबर एकत्र यावे, असा सल्ला राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांना दिला.
कॉंग्रेसला पवार यांनी दिलेल्या उपमेशी आपण असहमत असल्याचे सांगून थोरात म्हणाले, पवार यांनी व्यक्त केलेल्या विचारामुळे कॉंग्रेस पक्षाचे नुकसान होईल असे मला वाटत नाही.
मात्र भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत तत्वाशी निगडीत विचारांचे जे लोक आहेत त्यांनी अशी टीका करण्यापेक्षा बरोबर यावे, कॉंग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र बरोबर यावे आणि लोकशाही आणि राज्यघटना टिकवण्यासाठी एकत्र लढाई करावीे.
कॉंग्रेस पक्ष ही एक विचारधार आहे. सध्याचे वातावरण पाहता कॉंग्रेसच्या विचारांसाठी कठीण दिवस आले आहेत. याचे कारण म्हणजे देशात धार्मिक भेदाभेद करणारे वाढले आहेत. भारतीय राज्यघटनेची मूलभूत तत्वे मानणारे आपण एका विचाराचे आहोत.
आपण सर्व एकत्र आलो तर कॉंग्रेसला पुन्हा चांगले दिवस येतील, असेही थोरात म्हणाले.