राजगुरूनगर – पुणे जिल्हा दूध संघाचे संचालक अरूण सिताराम चांभारे यांच्या संचालक पद रद्द करण्याच्या आदेशाला राज्य सहकारी संस्थाचे सहनिबंधक शहाजी पाटील यांनी मंगळवारी (दि. 11) स्थगिती दिली आहे. पुढील सुनावणी 10 सप्टेंबर रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. तोपर्यंत ही स्थगिती देण्यात येत असल्याचे शहाजी पाटील यांनी आदेशात म्हटले आहे.
जिल्हा दुध संघाचे संचालक अरूण चांभारे हे 2022 मध्ये संघावर दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. 2010 ते 2015 दरम्यान संघाचे संचालक होते. 2013 मध्ये त्यांच्या नातेवाइकांनी संघाच्या उत्पादनाची खरेदी व वाहतूक ठेका घेतला. त्यात ते थकीत राहिले होते.
त्यावरून अरुण चांभारे याना जबाबदार धरीत त्यांच्या पदावर गदा आणण्याचे प्रयत्न विरोधक करीत आहेत अरुण चांभारे यांचे संघाचे संचालक पद रद्द करण्यात येत असल्याचा आदेश विभागीय निबंधक, पुणे यांनी 16 जूनला दिला होता. त्यावर अरुण चांभारे यांनी राज्याच्या सहकार निबंधकांकडे दाद मागितली होती.
संचालक अरुण चांभारे यांच्या दूध संघाच्या प्रकरणात कुठल्याही प्रकारचा काही संबंध नव्हता.चांभारे यांच्या बाजूने न्यायालयाने तीनवेळा निकाल दिले आहेत. दरम्यान, राज्य सहकारी संस्था सह निबंधक शहाजी पाटील यांनी पद रद्दच्या आदेशाला स्थगिती दिल्याने तालुक्यात चांभारे समर्थकांनी जल्लोष केला.