नगर (प्रतिनिधी) – यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांडातील मुख्य संशयित आरोपी बाळ बोठे तीन महिन्यांपासून सापडत नसल्याने, त्याला फरार घोषित करण्यासाठी पोलिसांनी पारनेर न्यायालयात अर्ज केला आहे. या अर्जावर लवकरच सुनावणी होईल, अशी माहिती तपासी अधिकारी पोलीस उपाधीक्षक अजित पाटील यांनी दिली.
30 नोव्हेंबर 2020 रोजी रेखा जरे यांची पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात हत्या झाली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत पाच आरोपी तत्काळ जेरबंद केले. या आरोपींकडून कटातील मुख्य सूत्रधार बोठे याचे नाव समोर आले.
बोठे याने जरे यांच्या हत्येची सुपारी दिल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असल्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तत्पूर्वीच बोठे पसार झाला. या हत्याकांडाला आता तीन महिने पूर्ण होत असून, अद्यापही बोठे सापडलेला नाही.
दरम्यान, बोठे याने जिल्हा न्यायालयात व नंतर औरंगाबाद खंडपीठात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्याला जामीन मिळालेला नाही. बोठे सापडत नसल्याने पोलिसांनी त्याच्याविरूद्ध पारनेर न्यायालयाकडून स्टॅडिंग वॉरंट मंजूर करून घेतले.
स्टॅडिंग वॉरंट काढूनही बोठे पोलिसांच्या हाती लागला नाही. तीन महिन्यापासून पोलिसांनी सर्वत्र त्याचा शोध घेतला. त्यामुळे बोठे याला आता रेखा जरे हत्येप्रकरणी फरार घोषित करण्यात यावे, असा अर्ज पोलिसांनी पारनेर न्यायालयात दाखल केला आहे.