..त्यामुळे चंद्राबाबू नायडू यांचे विमानतळावरच धरणे

तिरूपती – आंध्रप्रदेश विधानसभेतील विरोधी पक्ष नेते चंद्राबाबू नायडू यांना तिरूपती विमानतळावर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना शहरात प्रवेश करण्यास मनाई केली त्यावेळी चंद्राबाबूंनी विमानतळावरच धरणे धरून या कारवाईचा निषेध केला. ते तिरूपती आणि चित्तूर येथे दौऱ्यासाठी जाणार होते.

आपल्याला का अडवण्यात येत असल्याची विचारणा त्यांनी पोलिसांना केली आणि पोलिसांशी त्यांनी हुज्जत घातली. तिरूपती येथील अधिकाऱ्यांनी चालवलेल्या मनमानीच्या विरोधात तेलगु देसम पक्षातर्फे तिथे निदर्शने केली जाणार होती. त्यात सहभागी होण्यासाठी ते हैदराबादहून तिरूपतीत आले होते. तथापि शहरात स्थानिक निवडणुकांसाठी आचार संहिता लागू असल्याने तुम्हाला या निदर्शनांमध्ये सहभागी होता येणार नाही असे पोलिसांनी त्यांना सांगितले.

येथे तेलगु देसम पक्षाच्या महिला उमेदवारावर निवडणूकीतून माघार घेण्यासाठी दबाव आणण्यात आला. त्याला न जुमानता त्या महिलेने आपला अर्ज कायम ठेवल्यानंतर अधिकाऱ्यांनी तिचा चहाचा स्टॉलच पाडून टाकला होता. त्या प्रकरणात तेलगु देसम पक्षातर्फे ही निदर्शने आयोंजित करण्यात आली होती. दरम्यान नायडू यांच्या या भेटीच्यावेळी तिरूपती आणि चित्तुर येथील तेलगू देसमच्या स्थानिक नेत्यांनाहीं त्यांच्या घरातच स्थानबद्ध करून ठेवण्यात आले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.