पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पूर्ववत करा; महापौरांचे आदेश

मुख्यसभेत नगरसेवकाने उपस्थित केला पाण्याचा प्रश्‍न

पुणे – शहर आणि परिसरात पावसाने दमदार हजेरी लावल्याने खडकवासला धरण भरले आहे. त्यामुळे मुठा नदीतून पाणी सोडण्यात आले. दुसरीकडे शहरातील अनेक भागांत पाणीटंचाई आहे. धरण भरले आहे, तर मग पाणी टंचाई कशी, असा सवाल सर्वपक्षीय नगरसेवकांनी मुख्यसभेत उपस्थित केला. दरम्यान, खडकवासला धरण 100 टक्‍के भरल्याने शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत करावा, असे आदेश महापौरांनी दिले.

धरणातील उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेऊन मागील काही महिन्यांपासून शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात केली जात आहे. उपलब्ध पाणीसाठा पुरण्यासाठी झोन प्रमाणे पाणीपुरवठा केला जातो. मात्र जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पाऊस हजेरी लावत असल्याने शहराला पाणीपुरवठा करणारे खडकवासला धरण 100 टक्‍के भरले आहे. तर इतर धरणे 40 टक्‍के भरली आहे. खडकवासला भरल्याने महापौरांनी जलपूजन केले, दुसरीकडे मुठा नदीतून पाणीही सोडण्यात आले. मात्र, शहराच्या पाणीपुरवठ्यात कोणतीही सुधारणा झालेली नाही.

या पार्श्‍वभूमीवर नगरसेविका वर्षा तापकीर यांनी पाण्याचा प्रश्‍न उपस्थित केला. धरण भरले असताना शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत का केला जात नाही, असा प्रश्‍न उपस्थित करत तो पूर्ववत करण्याची मागणी केली. त्यानंतर खराडी परिसरात आठवड्यातून एकवेळ तेही कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. वारंवार आंदोलने करूनही काहीच कार्यवाही आणि नियोजन केले जात नसल्याचा आरोप ऍड. भैय्यासाहेब जाधव यांनी केला.

पाऊस पडून धरण भरले तरीही पाणीकपात का थांबविली जात नाही, असा प्रश्‍न अश्‍विनी भागवत यांनी उपस्थित केला. निवडून आल्यापासून पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत असल्याची खंतही त्यांनी व्यक्‍त केली. महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांमध्ये 9-10 दिवसांतून एकदा पाणी येते. या गावांमधील नागरिकांना पुरेसे पाणी देण्याची मागणी या गावांचे नवनिर्वाचित नगरसेवक गणेश ढोरे यांनी केली.

एकाच वेळी संपूर्ण शहराला पाणीपुरवठा
नगरसेवकांच्या प्रश्‍नांवर पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी खुलासा केला. ते म्हणाले की, टेमघर हे धरण भरले जात नाही, त्यामुळे संपूर्ण पाणी खडकवासला धरणात येते. त्यामुळे खडकवासला धरण 100 टक्‍के भरले आहे. तर इतर धरणे 40 टक्‍के भरली आहेत. खडकवासला धरणातून मुठा नदीत जरी पाणी सोडण्यात आलेले असले तरी वरील धरणे 100 टक्‍के भरल्याशिवाय पाणीपुरवठा पूर्ववत करता येणार नाही. त्यावर महापौर मुक्‍ता टिळक यांनी खडकवासला धरण भरले असल्याने संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत करा आणि एकाच वेळी संपूर्ण शहराला पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.