नवी दिल्ली – देशातील कोट्यावधी असंघटित कामगारांची नोंदणी करण्यासाठी केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने ई-श्रम नावाचे पोर्टल सुरू केले आहे. यामुळे देशातील 38 कोटी असंघटित कामगारांची नोंद होणार आहे. त्या आधारावर या कामगारांना आवश्यक त्या सोयी सुविधा देण्यासाठी सरकारला मदत होणार आहे.
यामध्ये स्थलांतरित कामगार, बांधकाम क्षेत्रात काम करणारे कामगार, दुकानात काम करणारे कामगार, घरकाम करणाऱ्या महिला इत्यादीचा समावेश आहे. यासंबंधातील नोंदणी प्रक्रिया गुरुवारपासून सुरू झाली आहे.
देशात प्रथमच असंघटित क्षेत्रातील कामगारांची नोंदणी होत आहे. हे काम फक्त नोंदणीवर थांबणार नाही तर सरकारकडून आणि इतर संस्थाकडून या कामगारांना काही सवलती मिळतील. अगोदरच असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी दोन लाख रुपयांचा अपघात विमा केंद्र सरकारकडून जाहीर झालेला आहे.
या संदर्भात कामगारांना काही मदत हवी असल्यास त्यांना 14434 या क्रमांकावर मदतीसाठी विचारणा करता येणार आहे. कामगाराने नोंदणी केल्यानंतर या कामगाराला चौदा आकड्याच्या क्रमांकासह ई-श्रम कार्ड देण्यात येईल. त्यासंदर्भात मिळालेली माहिती राज्य सरकारला पुरविण्यात येईल.
या आधारे राज्य सरकारला जर या कामगारांना काही मदत करायची असेल तर सहज करता येणार आहे. नोंदणी वेळी कामगाराला आधार क्रमांक, बॅंक खाते क्रमांक, घराचा पत्ता, मोबाईल क्रमांक आणि कोणत्या क्षेत्रामध्ये काय काम करत आहे या संदर्भातील माहिती द्यावी लागणार आहे. या विषयावर बऱ्याच वर्षापासून काम चालू होते आता त्याची अंमलबजावणी होऊ लागली आहे.