- मातृरोपे उशिरा आल्याने लागवड उशिरा झाली
पिंपरी – लालचुटूक, रसरशीत आणि चवीला गोड असलेल्या स्ट्रॉबेरीची आवक मंदावली आहे. अगदी अभावानेच स्ट्रॉबेरी बाजारात आढळत असल्याचे चित्र आहे. त्यातही स्ट्रॉबेरीचा भाव वधारल्याने दिवाळीत स्ट्रॉबेरी ग्राहकांच्या आवाक्याबाहेर गेली होती.
दिवाळीदरम्यान देशभरातून स्ट्रॉबेरीला मोठी मागणी असते. साधारणत: मे महिना, दिवाळी आणि नाताळ अशा तीन हंगामामध्ये स्ट्रॉबेरीची मोठी आवक होत असते. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळबाजारांमध्ये आवक मंदावल्याने पिंपरीतील मोशी व पिंपरी बाजारातही स्ट्रॉबेरीची आवक होत नसल्याचे चित्र आहे. करोनामुळे मातृरोपे लागवडीस झालेला उशीर आणि सप्टेंबरमध्ये परतीच्या पावसाचा वाढलेल्यामुक्कामात दिलेला जोरदार फटका याचा परिणाम स्ट्रॉबेरीच्या लागवडीवर जाला आहे. परिणामी मोजक्या काही ठिकाणी स्ट्रॉबेरीची 700 रुपये प्रति किलो या उच्चांकी दराने विक्री सुरु आहे.
जूनमध्ये येणारे स्ट्रॉबेरीचे मातृवक्ष जुलैमध्ये आल्यानंतर रोपे निर्मिती करण्यात आली. सप्टेंबरमध्ये होणारी लागवड ऑक्टोबर महिन्यात झाली. या लागवडीच्या काळात महाबळेश्वर तालुक्यात परतीचा पावसाने झोडपून काढले. यामुळे लागवड रखडण्याबरोबर लागवड केलेली रोपे खराब झाली. यामुळे साधारणपणे एक महिना जास्त काळ लागवड पुढे गेलेली आहे.
लागवडीनंतर साधारणपणे 55 ते 60 दिवसांनंतर स्ट्रॉबेरीचा बहर सुरू होतो. मात्र या वर्षी दिवाळीचा सणापर्यंत लागवडच सुरू असल्याने दिवाळीत स्ट्रॉबेरी उपलब्ध होत नाही. स्ट्रॉबेरीच्या हंगामाच्या सुरूवातीपासून अडचणी सुरू झाल्या आहेत. मातृरोपे उशिरा आल्याने लागवड उशिरा झाली. त्यामुळे दिवाळीचा सण हातातून गेला आहे.